“माझी भूमिका चुकीची असेल तर, तुम्ही सांगावे…’; हर हर महादेव सिनेमावरून संभाजीराजे पुन्हा संतापले

मुंबई – ‘हर हर महादेव’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे, असा दावा छत्रपती संभाजीराजे यांनी पुण्यात काही दिवसांपसूर्वी बोलताना केला होता. संभाजीराजे म्हणाले होते की, नव्याने प्रदर्शित करण्यात येणाऱ्या ऐतिहासिक चित्रपटांत इतिहासाची मोडतोड करण्यात येत आहे. ज्या घराण्याचे आपण नाव सांगतो, जे नाव आणि कर्तृत्व ही आपली अस्मिता आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचे विपर्यस्त चित्रण दाखवले तर सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी निर्माते आणि दिग्दर्शकांना दिला होता.
दरम्यान, आता या चित्रपटावरून पुन्हा एकदा संभाजीराजे आक्रम झाल्याचं दिसून आले आहे. हरहर महादेव चित्रपटात स्त्रियांविषयी आक्षेपार्ह पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. इतिहास संशोधकांनी बोलावे. जर माझी भूमिका चुकीची असेल, तुम्ही सांगावे, मी पुन्हा कधीही अशा चित्रपटांवर पत्रकार परिषद कधीही घेणार नाही, बाजीप्रभू आणि शिवाजी महाराजांची लढाई दाखवणं मान्य आहे का? चुकीचा इतिहास दाखवण्यापेक्षा चित्रपट काढूच नका, खरा इतिहास दाखवा, विरोध थांबवतो, असे संभाजीराजे म्हणाले.
बेळगाव दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांनी हर हर महादेव चित्रपट झी मराठीवर दाखवला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी झी मराठी वाहिनीला काहीदिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत इशारा दिला होता. “हर हर महादेव’ हा वादग्रस्त चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल’. असं संभाजीराजेंनी म्हटलं होत.





