Ajit Pawar : मनातलं बोलून झाल्यावर मन मोकळं होतं, अजित पवारांचा राजेंद्र पवारांना टोला

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात बोलताना पुतणे रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांच्या वक्तव्यावर जोरदार टोला लगावला. “माणसाच्या मनात जे येतं, ते बोलून झाल्यावर मन हलकं होतं,” असं म्हणत त्यांनी राजेंद्र पवारांच्या राजकीय सुरुवातीच्या आठवणींवर भाष्य केलं. अजित पवारांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवातही याच कारखान्यापासून झाल्याचं सांगितलं आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन होऊन दाखवल्याचा अभिमान व्यक्त केला.
राजेंद्र पवारांचं वक्तव्य काय?
सांगलीतील एका कार्यक्रमात अजित पवारांनी रोहित पवारांना टोमणा मारत, भावकीचा विचार केला म्हणूनच तू निवडून आला, आपण पोस्टल मतांवर निवडून आलोय हे लक्षात ठेवावं असं अजित पवार म्हणाले होते. याला प्रत्युत्तर देताना राजेंद्र पवार म्हणाले, “माझ्या वडिलांनी अजितदादांना संधी दिली, मला नाही.
मला सांगितलं, सगळ्यांनीच राजकारणात यायचं नसतं. पण संधी असते तेव्हा खेचून घ्यावी लागते.” यावर अजित पवारांनी पुण्यातील सभेत, “माझ्या बंधूंनी बारीकसारीक सगळं सांगितलं, पण त्या मागची भूमिका माहीत नाही. बोलून मन मोकळं होतं,” असा टोला लगावला.
माळेगाव कारखान्याचा उल्लेख
अजित पवारांनी सांगितलं, “काहींनी मला छत्रपती साखर कारखान्याचा चेअरमन होऊ दिलं नाही. म्हणून मी माळेगावला एक एकर जमीन घेतली, सभासद झालो आणि तिथला चेअरमन झालो. आता माळेगावच्या बरोबरीने छत्रपती कारखान्याने भाव द्यावा.” यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.
बारामतीतील सभेत अजित पवारांनी शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर वाढवण्याचं आवाहन केलं. “AI मुळे ५०% पाण्याची बचत आणि ४०% उत्पादनवाढ शक्य आहे. ठिबक सिंचन हा शेतकऱ्यांचा कणा आहे,” असं ते म्हणाले. तसेच, रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १० कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा केली आणि रस्ते खोदणाऱ्यांना १०-२० हजारांचा दंड ठोठावण्याचा इशारा दिला.
शरद पवारांनी डोरलेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेला ३ कोटींचा चेक दिल्याचं सांगत अजित पवारांनी २४ वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी ३.६० कोटी रुपये खर्चाचं आश्वासन दिलं. “गरज पडली तर मी वैयक्तिक मदत करेन,” असं त्यांनी जाहीर केलं.




