मस्क यांना झाली ताजमहल भेटीची आठवण

सॅन फ्रान्सिस्को – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले टेस्ला कारचे प्रमुख ऍलन मस्क यांनी 2007 मध्ये भारताला भेट दिली होती. त्यावेळी ऍलन मस्क यांनी ताज महल पाहिला होता. त्याची अचानक आठवण आता मस्क यांना आली आहे.
मस्क यांनी या भारत भेटी संदर्भात आणि ताजमहाल संदर्भात आज एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये मस्क म्हणतात की, ताजमहाल खरोखरच जगातील आश्चर्यकारक वास्तु आहे. विशेष म्हणजे मस्क यांच्या ट्विटनंतर मस्क यांच्या मातोश्री मये मस्क यांनी या विषयावर ट्विट केले आहे.
या ट्विटमध्ये मये मस्क यांनी म्हटले आहे की 1954 मध्ये ऍलन मस्क यांचे आजी आणि आजोबा भारतात गेले होते. त्यावेळी त्याने ताज महल पाहिला होता. केवळ एका इंजिनाच्या विमानातून त्या दोघांनी त्या वेळी प्रवास केला होता. त्यावेळी विमानात रेडिओ किंवा जीपीएसची व्यवस्था नव्हती.
मस्क यांचे आजी-आजोबा धाडसी जीवन जगले असे या ट्विटमध्ये मस्क यांच्या मातोश्रींनी म्हटले आहे. कालच मस्क यांनी आपल्या मृत्यूबद्दल विनोद करणारे ट्विट केले होते. त्यानंतर त्यांच्या आईने असला विनोद योग्य नाही असे म्हटल्यानंतर मस्क यांनी माफी मागून आपण जिवंत राहण्याचा प्रयत्न करू असे म्हटले होते. गेल्या महिन्यात मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्यासंदर्भात निर्णय जाहीर केल्यानंतर जगभरातील वृत्त माध्यमांमध्ये त्यांच्या संबंधात उलट-सुलट बातम्या चालू आहेत.
मस्क यांच्या भारत भेटीची शक्यता
मस्क यांनी अचानक भारत भेटीच्या आणि ताज महलची आठवण काढल्यामुळे आता ते लवकरच भारताला भेट देण्याची शक्यता मस्क यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे. मस्क यांना टेस्लाचे उत्पादन आणि विक्री भारतात करण्याची इच्छा आहे. मात्र भारतामध्ये कर जास्त असल्याचे त्यांनी अनेक वेळा सांगितले आहे. मात्र भारत सरकारने अगोदर भारतात उत्पादन सुरू करा त्यानंतर सवलती दिल्या जातील असे सांगितले आहे. त्यामुळे आधार मस्क भारतात येऊन पुन्हा भारतातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची शक्यता मस्क यांच्या चाहत्यांना वाटत आहे.





