पुणे जिल्हा | सांगवीत फुटपाथला मुरमाची भर रस्त्याचे नुकसान टळले ; दैनिक प्रभात इफेक्ट

भाटघर, (वार्ताहर)- कापूरहोळ – भोर रस्त्यावरील सांगवी येथे फुटपाथला कमी मुरूम टाकल्याने फुटपाथ तीन ते चार इंचने रस्ता लेवल पेक्षा खाली गेले होते. यामुळे अवजड वाहने फुटपाथला उतरवताना वाहनाचा टायरमुळे नवीन रस्त्याची किनार तुटत होती. याबाबतचे वृत्त शुक्रवारी (दि.१०) दैनिक प्रभातमधून प्रसिद्ध झाले. याची तात्काळ दखल घेत संबंधित ठेकेदाराच्या कंपनीने याठिकाणी मुरमाची भर टाकली आहे.
कापूरहोळ-भोर रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण एक वर्षापासून सुरू आहे. बहुतेक ठिकाणी एक बाजू पूर्ण झाल्याने नवीन सिमेंटच्या रस्त्यावरून वाहतूक सुरू केली आहे. परंतु सांगवी येथे रस्त्याच्या फुटपाथला मुरूम कमी टाकल्याने या ठिकाणी रस्ता लेवलपेक्षा फुटपाथ खाली गेले होते. दोन अवजड वाहने क्रॉस होताना वाहनाचा टायर रस्त्यावरून फुटपाथला जात असताना रस्त्याची किनार तुटत होती.
एक वर्षापासून कापूरहोळ-भोर-वाई रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. सद्यस्थितीला काम प्रगतीपथावर आहे. कापूरहोळपासून भाटघर गावच्या हद्दीपर्यंत काम झाले आहे. रस्त्याचे काम झाल्याने फुटपाथला मुरूम टाकून एका बाजूने वाहतूक सुरू केली आहे. परंतु सांगवी हद्दीतील रस्त्याच्या चढावरील फुटपाथला मुरूम कमी टाकला होता. मुरुमाची भर टाकल्याने फुटपाथ रस्ता समांतर झाला आहे. यामुळे भविष्यात नुकसान टळल्याने स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त केले आहे.





