पिंपरी | अल्पवयीन मुलीवर खुनी हल्ला; तिघांना अटक

शिरगाव, (वार्ताहर) – देह विक्रीसाठी नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीला गळा दाबून व चाकूने वार करीत खुनी हल्ला केला. याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि .26) व सोमवारी (दि.27) या दोन दिवसाच्या कालावधीत मावळातील सोमाटणे व गाडुंबरे गावाजवळ घडली.
याप्रकरणी 16 वर्षीय मुलीने शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी पवन कुमार अयोध्या प्रसाद (वय 23 रा. उत्तर प्रदेश ) महिला आरोपी व दीपक गोवारी यादव (वय 21 रा. उत्तर प्रदेश) या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक यांनी पिडीतेशी प्रेम संबंध तयार केले. त्यानंतर पवन कुमार व महिला आरोपीने तिच्याकडे देह विक्रीची मागणी केली.
यावेळी पिडीतेने त्यांना नकार दिला. मूळगावी सोडण्याचा बहाणा करून तिला दुचाकीवर घेऊन जाऊन महिला आरोपीच्या भाड्याच्या खोलीत तिला ठेवले. त्यानंतर सोमवारी सायंकाळी तिला अंधारात घेऊन जाऊन तिच्या मानेच्या पाठीमागील बाजूला चाकूने वार केला,
तसेच गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पिडीतेने आपली सुटका करून घेत थेट पोलिसांकडे याबाबत तक्रार केली . पोलिसांनी तिघांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.





