Alandi: प्रदक्षिणा रोड, आळंदी येथील जाहूरकर महाराज संस्था तात्काळ बंद करण्याचे आदेश आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी आज शनिवारी (दि. 7 मार्च) दिले. अध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर शारीरिक व मानसिक शोषण झाल्याचे उघडकीस आल्यानंतर नगरपरिषदेने तातडीने कारवाई केली. संस्थेतील ४३ मुले व ४ मुलींना तीन शासकीय बालगृहांमध्ये सुरक्षितपणे हलविण्यात आले आहे. प्रत्यक्ष पाहणीत गंभीर त्रुटी – आज सकाळी ११ वाजता मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या नेतृत्वात नगरपरिषद अधिकारी, आळंदी दामिणी महिला पोलीस पथक आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी यांनी संस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत अनेक गंभीर त्रुटी आढळल्या. संस्थेत विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज व आधार कार्ड नोंदी नव्हत्या. पालकांचे प्रवेश अर्ज व छाननी समिती अस्तित्वात नव्हती. नियमानुसार कर्मचारी वर्ग उपलब्ध नव्हता. अभ्यासिका व भोजन हॉल एकाच खोलीत होते. स्वयंपाकघर व निवासाची जागा अपुरी होती. पुरेशी व हवेशीर स्नानगृहे-स्वच्छतागृहे नव्हती. भोजनाचा निश्चित मेनू नव्हता आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीचे उरलेले अन्न सकाळी दिले जात होते. शिवाय गेट रजिस्टर, प्रथमोपचार पेटी, तक्रार पेटी आणि नियम-अटींचे फलकही संस्थेत नव्हते. परवानाच नाही; संस्था अनधिकृत – तपासणीत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे संस्थेकडे मुले व मुली निवासी ठेवण्याचा शासनाच्या कोणत्याही विभागाचा वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. महिला व बाल विकास विभागाच्या ३ जुलै २०२५ च्या शासन निर्णयातील तरतूद २२(अ) अन्वये अशा अनधिकृत व नियमभंग करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. त्या अधिकाराचा वापर करत संस्था तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले. ४७ बालकांचे तीन बालगृहांमध्ये पुनर्वसन – संस्थेतील ४३ मुले व ४ मुलींना ज्ञानेश बालमंदिर, फुलगाव (मरकळ रोड); ज्ञानमंदिर बालगृह, (नारकरवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे); आणि सह्याद्री बालगृह, (पंकटिका, घोडेगाव रोड, मंचर, जि. पुणे.) या तीन शासकीय व मान्यताप्राप्त बालगृहांमध्ये सुरक्षितपणे हलविण्यात आले आहे. कारवाईवेळी उपस्थित पथक – या कारवाईत मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्यासमवेत आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, नगरपरिषद कर व प्रशासकीय सेवा विभाग सीमा चारभे, लेखापरीक्षक प्रदीप आवारी, सहा. प्रकल्प अधिकारी वैशाली पाटील, CLTC अभियंता मिथिल पाटील, आळंदी पोलिस दामिणी पथकाच्या पूजा श्रीहरी नाईक, श्वेता विलास शेलकर, समुदाय संघटक अर्जुन घोडे, बाल संरक्षण अधिकारी शत्रुघ्न रुस्तुम खोकले, पोलिस कर्मचारी मच्छिंद्र शेंडे उपस्थित होते. पुढील कारवाईसाठी पत्रव्यवहार – या प्रकरणी जिल्हाधिकारी पुणे, पोलीस उपायुक्त पिंपरी-चिंचवड, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी खेड (राजगुरूनगर) आणि धर्मादाय आयुक्त पुणे यांना संस्थेचा परवाना रद्द करणे व पुढील कायदेशीर कारवाईसाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.