मुंबईच्या लोकलमध्ये प्रवाशाची हत्या; लुटमारीला विरोध केल्याने गर्दुल्यांच्या टोळक्याचा जीवघेणा हल्ला

मुंबई – मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमध्ये नशेडी तरुणांनी हैदोस घातल्याच्या घटना अनेकदा समोर आलेल्या आहेत. अशाच एका गर्दुल्यांच्या टोळक्याने एका प्रवाशाचा धारदार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक घटना लोकलमध्ये घडली.
ही घटना साधारण दोन दिवसांपूर्वीच्या मध्यरात्री आहे. परंतु या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. हल्ला करणाऱ्यांना लोकलमधील अन्य लोकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
दत्तात्रय भोईर असे हत्या झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसांमध्ये आरोपी तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या खडवली आणि वाशिंद या दोन स्थानकांदरम्यान लोकलमध्ये हा प्रकार घडला आहे. दरम्यान ही घटना 27 व 28 एप्रिलच्या मध्यरात्री ही घटना घडली.
या तरुणांनी लोकलमधील लोकांचे मोबाइल आणि सोन्याच्या साखळ्या खेचण्याचाही प्रयत्न केला. ज्या प्रवाशांनी याला विरोध केला त्यांना या तरुणांनी पट्ट्यानं मारहाण केली.
यातच शहापूरचे रहिवासी असलेल्या दत्तात्रय भोईल यांनी विरोध केला तर या तरुणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रानं वार केले. भाईर हे उल्हासनगरमधील नातेवाईकांचा एक हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी निघाले होते.





