पुणे जिल्हा | करमोळी येथे दारूच्या नशेत एकाचा खून

पौड, (वार्ताहर) – करमोळी (ता. मुळशी) येथे दारूच्या नशेत मित्रांकडूनच झालेल्या वादातून डोक्यात कुदळ मारून एकाचा खून केल्याची घटना घडली आहे. यामध्ये तानाजी गंगाराम मंडले (वय 29, रा. करमोळी) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी स्वप्निल अनंता कळमकर (वय 36, रा. करमोळी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी गंगाराम मंडले यांनी पौड पोलिस स्टेशनला फिर्याद दिली.
तानाजी आणि आरोपी स्वप्निल हे करमोळी येथे शेजारी शेजारी राहायला असून चांगले मित्र होते. ते दोघे एकमेकांसोबत दारू प्यायचे व फिरायचे. रविवारी (दि. 14) दोघेही बाहेर गेले होते. तानाजी दारू पिऊन स्वप्निल कळमकर याच्या घरीच झोपला होता.
सोमवारी (दि. 15) सकाळी स्वप्निलनेच तानाजीच्या घरी जाऊन सांगितले की, तानाजी झोपलेला आहे. तो उठत नाही. तानाजीच्या घरच्यांनी सकाळी स्वप्निलच्या घरी जाऊन पाहिले असता तानाजी हा बेडवर झोपलेला होता तसेच त्याच्या डोक्यातून खूप रक्त येत होते.
बेडच्या बाजूला एक रक्ताने मखलेली कुदळ यावेळी मिळून आली. तानाजीच्या घरच्यानी त्याला पौड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. तत्पूर्वी त्याचे निधन झाले होते. आरोपी स्वप्नील कळमकर याला पौड पोलिसांनी अटक केली.




