कर्नूल बस दुर्घटनेला वेगळं वळण: अपघातास कारणीभूत असलेला बाइकस्वार दारूच्या नशेत?; CCTV फुटेजमुळे खळबळ

नवी दिल्ली: आंध्र प्रदेशातील कर्नूल येथे एका खासगी बसला लागलेल्या भीषण आगीत २० जणांचा मृत्यू झाल्यानंतर, अपघातास कारणीभूत ठरलेल्या बाइकस्वाराच्या कथित दारूच्या नशेत असण्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. एका दुचाकीला धडक बसल्यानंतर ही बंगळूरूच्या दिशेने जाणारी बस शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पेटली.
अपघातानंतर दुचाकी बसखाली ओढली गेली. दुचाकीचे इंधन झाकण (fuel cap) उघडे असल्यामुळे इंधनामुळे ठिणगी पडून आग लागली आणि ती संपूर्ण बसमध्ये अतिशय वेगाने पसरली. यात २० प्रवाशांचा करुण अंत झाला. बसमध्ये एकूण ४४ प्रवासी होते, त्यापैकी अनेकांनी खिडक्या तोडून किंवा दरवाज्यातून बाहेर उडी मारून जीव वाचवला.
Update: Moments before the tragic bus fire incident in #Kurnool, CCTV footage captured a biker entering the petrol pump premises.The deceased has been identified as Shivashankar,aged 24.The rider’s actions prior to the incident are under scrutiny following preliminary review. https://t.co/zAkU4ar92M pic.twitter.com/Emj9IFqjhg
— Yasir Mushtaq (@path2shah) October 25, 2025
ऑक्टोबर २४, पहाटे २.२३ वाजता एका पेट्रोल पंपावर रेकॉर्ड झालेल्या फुटेजमध्ये, कथितपणे तोच बाइकस्वार इंधन भरण्यासाठी थांबल्याचे दिसत आहे. फुटेजमध्ये बाइकस्वार आणि त्याच्यासोबत असलेला व्यक्ती इंधन भरण्यासाठी पंपावरील कर्मचाऱ्याला बोलावताना दिसतात. काही सेकंदांनंतर बाइकस्वार अस्थिरपणे गाडी वळवून घेऊन जातो. पेट्रोल पंपातून बाहेर पडताना त्याला गाडीचा संतुलन राखण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि गाडी भरकटताना दिसत आहे.
हा बाइकस्वार दारूच्या नशेत असल्याचा पोलिसांना आणि प्रवाशांना संशय आहे. दरम्यान, प्रवाशांना वाचवण्यासाठी बाहेरच्या दरवाज्यातून उडी मारून बचावलेल्या बस चालकाला ‘परिस्थितीचा अंदाज घेण्यात अपयश’ आले, असे एका पोलिस अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले. या घटनेमुळे महामार्गांवरील प्रवाशांच्या सुरक्षिततेवर आणि वाहनांच्या सुरक्षेच्या मानकांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.





