प्रभात वृत्तसेवा खालापूर – देवन्हावे गावात मित्रानेच मित्राचा खून करून पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. खोपोली पोलिसांनी तब्बल महिनाभर चाललेल्या तपासानंतर भारत-नेपाळ सीमेवर आरोपीला गाठत शिताफीने अटक केली आहे.ही घटना ११ सप्टेंबर २०२५ रोजी देवन्हावे येथे घडली होती. भाड्याच्या खोलीत राहत असलेल्या अख्तर हबीब बैठा (रा. पिरोखर, जि. मधुबनी, बिहार) या आरोपीने आपल्या मित्राचा पारस हरिहर सिंग (वय ५०, रा. खैरवा, जि. सितामढी, बिहार) याचा दगडाने मारून खून केला. तपासात उघड झाले की, मयत पारस सिंग यांनी आरोपीकडे हातउसने दिलेले रु. ६,हजार परत मागितले, त्यामुळे आरोपीने रागाच्या भरात हा खून केला.गुन्ह्यानंतर आरोपी फरार झाला होता. तो प्रथम ठाणे, त्यानंतर डहाणू येथे गेला आणि फोन बंद केला. त्यामुळे त्याचा ठावठिकाणा लागणे पोलिसांसाठी आव्हान ठरले. मात्र खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांच्या नेतृत्वात पोहवा संदीप चव्हाण, पोशि प्रणित कळमकर, परसराम टेकाळे, किरण देवकाते आणि समीर पवार अशी विशेष पथके तयार करण्यात आली. पथकाने आरोपीचा शोध सुरत, अहमदाबाद, मधुबनी आणि सितामढी (बिहार) येथे घेतला. अनेक अडचणी असूनही तपास पथकाने स्थानिक गोपनीय सूत्रांच्या मदतीने आरोपी नेपाळ सीमेजवळील एकदराबेला, महोत्तरी येथे असल्याची माहिती मिळवली. पोलिसांनी आरोपीच्या मनोवृत्तीचा अभ्यास करून त्याचे नातेवाईक भेटण्यासाठी भारत-नेपाळ सीमेवर येणार असल्याची खात्री केली आणि शिताफीने सापळा रचून त्याला सीमेवरच ताब्यात घेतले. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता ४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास सुरू आहे.