निर्घृण हत्या, 12 जुने गुन्हे आणि दहशतीचे साम्राज्य! राजू भाळे टोळीवर मकोकाचा बडगा

भवानीनगर: पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांत दहशत पसरवून सातत्याने नियोजनबद्ध गुन्हे करणाऱ्या राजेंद्र ऊर्फ राजू महादेव भाळे आणि त्याच्या टोळीतील १३ सदस्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) कठोर कारवाई करण्यात आली आहे. ही माहिती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी दिली.
२७ फेब्रुवारी २०२५ रोजी इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे उत्तम जालिंदर जाधव (वय ३४, रा. खोरोची) यांची दगडाने ठेचून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येत १३ आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
यानंतर वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य आरोपी राजेंद्र ऊर्फ राजू महादेव भाळे (रा. खोरोची), रामदास ऊर्फ रामा शिवाजी भाळे (रा. खोरोची), शुभम ऊर्फ दादा बापू आटोळे (रा. शेळगाव), स्वप्निल बबन वाघमोडे (रा. रेडणी), नाना भागवत भाळे (रा. खोरोची), निरंजन लहू पवार (रा. खोरोची), तुकाराम ज्ञानदेव खरात (रा. खोरोची), मयूर ऊर्फ जिजा मोहन पाटोळे (रा. निमसाखर), अशोक बाळू यादव (रा. शेळगाव), धनाजी गोविंद मसुगडे (रा. कारुंडे, ता. माळशिरस, जि. सोलापूर), सोमनाथ बबन पवार (रा. कळंब), सनी विलास हरिहर (रा. अंथुर्णे) आणि अक्षय भरत शिंगाडे (रा. शेळगाव) यांच्यावर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली.
राजू भाळे याच्यावर यापूर्वी १२ गुन्हे दाखल असून, तो सराईत गुन्हेगार आहे. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील इंदापूर, माळशिरस आणि नातेपुते परिसरात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्याने नियोजनबद्ध पद्धतीने गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. या टोळीला आळा घालण्यासाठी वालचंदनगर पोलिसांनी मकोकाअंतर्गत ही कारवाई केली.
ही कारवाई पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, महेश बनकर, अभिजीत कळसकर, शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील, जगदीश चौधर, विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, प्रेमा सोनावणे आणि सचिन खुळे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
समाजातील गुन्हेगारी मोडीत काढण्याचा निर्धार –
अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी सांगितले की, यापुढेही समाजातील गुन्हेगारी पूर्णपणे नष्ट करण्यासाठी अशा सराईत गुन्हेगारांवर मकोकाअंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच, गुन्हेगारांना कोणत्याही प्रकारे मदत करणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.





