MCOCA Action : एकाच कुटुंबातील ६ जणांवर ‘मोक्का’! चार जिल्ह्यांत दहशत माजवणाऱ्या टोळीवर पोलिसांची कारवाई
MCOCA Action : पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड जिल्ह्यांत सक्रिय असलेल्या योगेश उर्फ अटल्या भोसले टोळीवर मोक्का कायद्याअंतर्गत पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे.

MCOCA Action – खून, दरोडा आणि जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे करत पुण्यासह अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड जिल्ह्यांत दहशत माजवणाऱ्या एकाच कुटुंबातील सहाजणांवर मोक्का कायद्याअंतर्गत पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी टोळीला धक्का बसला आहे. टोळी प्रमुख योगेश उर्फ अटल्या ईश्वर भोसले ( २४) याच्यासह सचिन ईश्वर भोसले (२५), गहिनीनाथ ईश्वर भोसले (२७), मिलन ईश्वर भोसले,
सोन्या ईश्वर भोसले (२५) आणि युवराज उर्फ धोंड्या ईश्वर भोसले (२५, सर्व रा. बेलगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांच्यावर ही कारवाई केली आहे. यापैकी युवराज भोसले हा फरार असून इतर आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. दौंड तालुक्यातील बोरीबेल गावाच्या हद्दीतील भापकरवस्ती येथे ११ जून २०२५ रोजी भरदिवसा एका कुटुंबाला धारदार शस्त्राचा धाक दाखवून, तुमच्याकडे जे काही आहे ते द्या, अन्यथा सगळ्यांना संपवून टाकतो,
अशी धमकी देत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ३ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल दरोड्यात लंपास करण्यात आला होता. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांना आरोपी शिरापूर परिसरात दुचाकीवरून येत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून टोळीप्रमुख योगेश भोसलेसह इतर आरोपींना ताब्यात घेतले आणि दौंड पोलिसांच्या स्वाधीन केले.
या प्रकरणी एकूण ७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी कोल्हापूर क्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली




