Bhor News : नसरापूर बालिकेवरील अत्याचार व हत्या प्रकरण; आरोपीला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील (Bhor News) नसरापूर येथे माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

Bhor News : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील (Bhor News) नसरापूर येथे माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर ६५ वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, निषेध म्हणून नसरापूरकरांनी आज गावात कडकडीत बंद पाळला.
या प्रकरणातील (Bhor News) ६५ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर आज दुपारी त्याला शिवाजीनगर येथील पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीला ७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू असून, घटनेमागील सर्व बाबींचा तपास केला जात आहे.
दरम्यान, न्यायालयातून आरोपीला बाहेर काढत असताना परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. अखंड मराठा समाज संघटनेच्या अर्चना शाह भिवरे-पाटील आणि अनिकेत देशमाने यांनी आरोपीची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
“आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला शिक्षा देऊ. अशा नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. महिला आणि मुलींवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी (Bhor News) व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेत महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणीही करण्यात आली.







