पुणे | महापालिका म्हणते ये रे ये रे पावसा…

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातील पाणीसाठा सध्या तळ गाठत आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचा महापालिकेकडून जूनच्या पहिल्या आठवडयात आढावा घेऊन शहरातील पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, हवामान विभागाने ६ किंवा ७ जूनला पुण्यात मान्सूनचे आगमन होणार असून, त्यानंतर जूनच्या सरासरीच्या ८० टक्के पाऊस होणार असल्याचा दिलासादायक अंदाज वर्तविला आहे.
त्यामुळे महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिका प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय तूर्तास पुढे ढकलला असून, १० जूनपर्यंत पावसाची वाट पाहून त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
महापालिका आयुक्तांनी पंधरा दिवसांपूर्वी शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला होता. त्यानंतर ३१ मे अथवा १ जून रोजी आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार होता. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजाने आता आणखी आठवडाभर वाट पाहण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
दररोज घेतली जाते अपडेट
महापालिका हवामान विभागाकडून दररोज मान्सूनच्या प्रगतीची अपडेट घेत आहे. मान्सूनचा प्रवास अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने सुरू असून, यावेळी पाऊस वेळेत आल्यानंतर तो ८० टक्के बरसणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
गेल्या काही वर्षांत पाऊस वेळेत आला, तरीही जून महिना पूर्ण कोरडा जात असल्याने महापालिकेस शहरात दिवसाआड पाणी देण्याची वेळ येत होती. हीच बाब लक्षात घेऊन महापालिका हवामान विभागाकडून दररोज मान्सूनबाबत अपडेट घेत आहे. या वर्षी जून महिन्यात ८० टक्के पाऊस होईल, असा अंदाज आहे.
धरणातील पाण्याची सद्यस्थिती (उपयुक्त पाणीसाठा)
– खडकवासला – ०.८६ टीएमसी
– पानशेत – १.६९ टीएमसी
– वरसगाव – २.२३ टीएमसी
– टेमघर – ०.११ टीएमसी
————————————–
एकूण – ४.८९ टीएमसी





