पुणे | साथीचे आजार असतानाही मनपा रुग्णालये सुट्टीवर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – साथीच्या आजारांनी शहर बेजार झाले आहे. यामुळे दवाखाने, रुग्णालयांत गर्दी वाढली आहे. अशा परिस्थितीत महापालिकेच्या आरोग्य विभागाने दहीहंडीच्या दिवशी महापालिकेची दवाखाने, रुग्णालये आणि प्रसूतीगृहांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्ण आजारी पडला, तर त्याला खासगी रुग्णालयांशिवाय पर्याय नसल्याची स्थिती आहे.
गोपाळकाल्यानिमित्त मंगळवारी महापालिकेचे दवाखाने, रुग्णालये आणि प्रसूतीगृहांना पूर्ण दिवस सुट्टी देण्यात आली आहे. अत्यावश्यक आरोग्य सेवेसाठी मंगळवार पेठेतील कमला नेहरू रूग्णालयात वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणार आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.
मात्र, शहरात डेंग्यू, चिकनगुनिय़ा, मलेरिया यांसह साथीच्या आजारांनी नागरिकांना बेजार केले आहे. त्यामुळे महापालिकेने दवाखाने, रुग्णालयांना सुट्टी दिल्यामुळे आजारी व्यक्तीने जायचे कुठे? असा प्रश्न उपस्थित होतो.
रुग्णालयापर्यंत जायचे कसे?
महापालिकेने अत्यावश्यक आरोग्य सेवेसाठी कमला नेहरू रुग्णालयात सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र, दहीहंडीच्या गर्दीत शहराच्या एका भागातून मध्यवर्ती भागात यायचे कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तेच क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एखादे रुग्णालय अत्यावश्यक सेवेसाठी सुरू ठेवले, तर पुणेकरांना दिलासा मिळेल, अशी मागणी होत आहे.





