Nagar | मनपा कर्मचार्यांची दिवाळी होणार गोड

नगर, (प्रतिनिधी) – महानगरपालिकेच्या कर्मचार्यांची दिवाळी गोड होणार असून दिवाळी पूर्वी कर्माचार्यांना ११ हजारांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. याबाबत कामगार युनियन व मनपा प्रशासनाची संयुक्त बैठक झाली. तसेच या बैठकीत कालबध्द पदोन्नतीचा फरक ९३ लाख रुपये (दि.३१) चे आत अदा केले जातील.
वैद्यकीय प्रतिपूर्तीचे प्रकरण मंजूर झाल्यानंतर कुठलीही ज्येष्ठता न लावता तात्काळ संबधित कर्मचारी यांना वैद्यकीय प्रतिपूर्तीचे पैसे अदा केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
महानगरपालिका कामगार यूनियनची महापालिका प्रशासनाला दिवाळी सणासाठी सर्व कामगारांना सानुग्रह अनुदान मिळणे कामी संप नोटीस जारी केली होती. त्यास अनुसरुन सहाय्यक कामगार आयुक्त यांनी (दि.२५) जून रोजीच महापालिका प्रशासनास पत्र देवून कामगार यूनियन पदाधिकारी यांचे बरोबर बैठक घेवून सदर प्रश्न निकाली काढणे बाबत सूचित केले होते.
त्यानुसार महापालिका प्रशासनाने आज गुरुवार (दि.२५) रोजी कामगार यूनियन पदाधिकारी यांचे बरोबर संयुक्त बैठक झाली. यावेळी आयुक्त यशवंत डांगे, कामगार युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर, बाबासाहेब मुदगल, सरचिटणीस कॉ. आनंदराव वायकर, उपाध्यक्ष नंदकुमार नेमाने, कार्याध्यक्ष राहुल साबळे, महादेव कोतकर, बलराज गायकवाड, बाबासाहेब राशिनकर, उपाध्यक्ष अजय सौदे, अमोल लहारे इत्यादी उपस्थित होते.
यावेळी बैठकीत सर्व पात्र कामगारांना दिवाळी सणापूर्वी एक रकमी ११ हजार सानुगृह अनुदान अदा केले जाईल. तसेच सफाई कामगारांना कचरा वाहन्यासाठी ढकल गाडी लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.तसेच पात्र कर्मचारी यांना पदोन्नती तसेच कालबध्द पदोन्नतीचे लाभ देण्यात येतील असे सांगण्यात आले. तसेच लाड व पागे समिती शिफाराशीनुसार तसेच अनुकंपा तत्वानुसार वारसांना मनपात नोकरी देण्यात येणार आहे.





