महापालिका निवडणूक: तिकिटासाठी उडी मारण्याचीही तयारी

संतोष गव्हाणे
पुणे – राज्यात पक्षीय गटबाजीतून बहुमतात आलेले सरकार सत्तेत आहे. आता या महायुतीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा राजकीय संसार सुखाने सुरू असल्याचे वरवर दिसत असले, तरी मंत्रिपद, निधी वाटप अशा विविध मुद्द्यांवर धुसफूस सुरू आहे.
राज्यात आपापल्या पक्षाची ताकद वाढविण्यासाठी हे पक्ष सातत्याने प्रयत्न करीत आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचे सांगितले जात असले, तरी आपल्या पक्षासाठी अधिकाधिक जागा मिळविण्याच्या प्रयत्नात हे तीनही पक्ष आहेत. तर, विरोधक म्हणून उद्धव बाळसाहेब ठाकरे शिवसेना आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष महाविकास आघाडीतून आव्हान देण्याच्या तयारी आहेत.
लोकसभा, विधानसभेची पायाभरणी स्वराज संस्था निवडणुकीतून होत असते. यामुळे महाविकास आघाडी आणि त्यांचे मित्रपक्षही या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. वॉर्ड रचनेची प्रक्रिया नगररचना विभागाकडे असल्याने ती सत्ताधार्यांच्या बाजूने झुकणारी असेल. हे खरे असले तरी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत उमेदवारीसाठी महाविकास आघाडीकडेही तेवढीच मोठी रांग असणार आहे.
प्रभाग रचना ही चारची असणार, हे निश्चित असल्याने उमेदवारीसाठी चाचपणी करताना मागील काही निवडणुकांचा लेखाजोखा तपासून इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. इच्छुकांची पहिली पसंती भाजप पक्ष असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडूनही उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न होणार आहेत.
उमेदवारीसाठी ही पक्षीय गर्दी लक्षात घेता अनेकांनी शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशीही संपर्क वाढविला आहे. उमेदवारीसाठी मिळेल त्या पक्षात उडी मारणार्यांची संख्या निवडणूक जवळ येईल, तशी वाढणार आहे.
अन्य पक्षांनाही महत्त्व…
गत पंचवार्षिंक निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक अधिक निवडून आले होते. त्यानंतर शिवसेना, मनसे, आरपीआय, एमआयएमआयएमचे नगरसेवक या क्रमाने नगरसेवकांची संख्या होती. आता दोन प्रमुख पक्षांत दोन गट पडल्याने आगामी महापालिका निवडणुकीची राजकीय गणितं वेगळीच असणार आहेत. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादीची उमेदवारी घेताना मोठी अडचण होणार, असाही विचार होऊ शकतो.
एकाच प्रभागात राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे दोन उमेदवार उतरणार असतील, तर यातून मतविभागणी होऊन ते भाजपच्या किंवा इतर पक्षाच्या उमेदवाराच्या पथ्थ्यावर पडू शकते. त्यामुळे शिवसेना किंवा राष्ट्रवादीपेक्षा इतर पक्षातून किंवा अपक्ष निवडणूक लढविण्यावरही अनेकजण भर देऊ शकतात. याच कारणातून महापालिका निवडणूक जाहीर होताच अन्य पक्षांकडून उमेदवारी घेणार्यांची संख्या वाढली तरी आश्चर्य वाटायला नको!





