सातारा : जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये जास्तीत जास्त नगराध्यक्ष आणि नगरसेवक भाजपचेच असतील. जिल्ह्यातील दहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कमळ या चिन्हावरच लढवल्या जातील, असे स्पष्ट संकेत पक्षाच्या जिल्हा कोअर कमिटीने दिले आहेत. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम येत्या दोन दिवसांमध्ये संबंधित नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात राबवला जाणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. भाजपच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी सातार्यातील हॉटेल फर्न येथे झाली. या बैठकीला पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, निवडणूक कमिटीचे धैर्यशील कदम आणि सर्व मंडल प्रतिनिधी आणि प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. नगरपालिका व नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये येत्या दोन दिवसांमध्ये इच्छुकांच्या मुलाखती सुरू होणार आहेत. जास्तीत जास्त नगराध्यक्ष व नगरसेवक आणि जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचाच निवडून येईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाची ध्येयधोरणे आणि नियमांचे पालन करण्यात येईल. स्थानिक समीकरणे लक्षात घेऊन, भाजपचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावेत, या दृष्टीने मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. पक्षातील इच्छुक उमेदवारांचा सन्मान करून, त्यांची मनोगते जाणून घेण्यात येतील, असे पक्षाचे जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. प्रत्येक प्रभागातून इच्छुकांची तीन नावे गुणवत्तानिहाय निवडून, त्याबाबतचा अहवाल जिल्हाध्यक्ष आ. अतुल भोसले हे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सादर करणार आहेत. तो प्रदेश कार्यकारणीला पाठवला जाणार आहे. मुलाखतींचा कार्यक्रम आणि त्या संदर्भात नियुक्त पदाधिकार्यांची यादी जिल्हा कार्यकारिणीकडून लवकरच जाहीर केली जाईल. इच्छुकांच्या मुलाखती सातार्यातील विसावा नाका येथे पक्षाच्या कार्यालयात होणार आहेत. संबंधित नगरपालिका कार्यक्षेत्रात कार्यकारिणीची स्थळे आणि वेळ कळवली जाणार असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या बैठकीत खासदार उदयनराजे, आ. डॉ. अतुल भोसले, मंत्री जयकुमार गोरे यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यात भाजपची ताकद वाढेल आणि या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी करण्यावर लोकप्रतिनिधी व कमिटीच्या सदस्यांचे एकमत झाले. आता मीच होतो नगराध्यक्ष या बैठकीनंतर खासदार उदयनराजे यांना पत्रकारांनी गाठून, बैठकीतील चर्चेसंदर्भात विचारणा केली असता, ते म्हणाले, जिल्ह्यातील पालिका निवडणुकांसाठी पक्षश्रेष्ठींकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांवर चर्चा करण्यात आली. सातार्यातील मनोमिलनाबाबत विचारले असता, मनोमीलन आहेच, पण तुमची उत्सुकता पाहून, मी आता खासदारकीचा राजीनामा देतो आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवतो, असे मिश्किल वक्तव्य त्यांनी केले. मनोमिलनाचा चेंडू पक्षश्रेष्ठींकडे बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मनोमिलनाचा मुद्दा पुन्हा पक्षश्रेष्ठींकडे सोपवला. पक्षाचे जिल्ह्यातील सर्व प्रमुख बसून निर्णय घेतील. निवडणूक फक्त सातार्यात नसून, इतरही पालिका क्षेत्रात आहे. तेथील राजकीय घडामोडींचा अंदाज घ्या. प्रत्येक वेळी तुमचा राजकीय बाण सातार्यावरच का? विधानसभा मतदारसंघनिहाय राजकीय समीकरणांचे अधिकार तेथील लोकप्रतिनिधी आणि कोअर कमिटीच्या सदस्यांना देण्यात आले आहेत. पक्षाच्या वरिष्ठ कार्यकारिणीकडून आलेल्या आदेशांनुसार पुढील रणनीती ठरवण्यात येईल. जिल्ह्यात सर्व निवडणुका कमळ चिन्हावर लढवल्या जाणार का, या प्रश्नावर, आता तुम्हीच काय ते ठरवा, असे मिश्किल उत्तर त्यांनी दिले.