मोठी बातमी..! पुढील आठवड्यात नगरपालिका निवडणुकांची घोषणा; 21 दिवसात प्रक्रिया पार पडणार

Municipality Election News : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोठा निर्णय घेतला असून, पुढील आठवड्यात पहिल्या टप्प्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. ही घोषणा सोमवारी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आचारसंहिता लागू होईल आणि २१ दिवसांत प्रक्रिया पार पडेल.
यानंतर तात्काळ दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते, तर शेवटच्या टप्प्यात मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होईल.
राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका तीन टप्प्यांत पार पाडण्याचे नियोजन केले आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका. प्रभाग रचना, ओबीसी आरक्षणासह सर्व तयारी पूर्ण झाल्याने ही घोषणा होत आहे. मतदान नोव्हेंबरमध्ये होईल, तर प्रत्येक टप्प्यानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका.
अतिवृष्टी आणि पुरामुळे ग्रामीण भागातील मदतकार्य सुरू असल्याने हा टप्पा नोव्हेंबरनंतर सुरू होईल. जिल्हाधिकाऱ्यांनी अतिवृष्टिग्रस्त भागात लगेच निवडणुका घेण्यास नकार दिल्याने हा निर्णय घेण्यात आला.
मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ ही मुदत दिली असून, न्यायालयीन प्रकरणांची शक्यता लक्षात घेता १५ ते २० जानेवारीपर्यंत मतदान होईल. मुदतीपूर्वी १० दिवस आधी प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न.
निवडणुकीसाठी ईव्हीएम पुरवठा मर्यादित असल्याने आयोगाने मध्य प्रदेश सरकारशी करार केला असून, इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून ५० हजार ईव्हीएम खरेदी केल्या आहेत. भारत निवडणूक आयोगाकडूनही मागणी केली आहे. प्रभाग रचना, आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता निवडणूक यंत्रणा सज्ज आहे.





