Sudhir Mungantiwar : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर महापौर पदावरून मोठी रस्सीखेच सुरू असल्याचे बघायला मिळत आहे. चंद्रपूर महापालिकेत देखील महापौर पदावरून राजकीय हालचालींना वेग आला असून, काँग्रेस बहुमताच्या जवळ आहे. असे असले तरी आता काँग्रेस सत्तेपासून दूर राहू शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस विरोधात उद्धवसेना, वंचित बहुजन आघाडी, दोन अपक्ष नगरसेवक आणि भाजपा यांची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच भाजप नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा दावा केला आहे. काँग्रेसचे दहाहून अधिक नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचे मुनगंटीवार म्हणाले आहेत. तसेच वंचित आणि उबाठा गटासोबत झालेल्या चर्चेविषयी देखील त्यांनी महत्वाची माहिती दिली. काय म्हणाले मुनगंटीवार? वंचित आणि उबाठा गटासोबत चर्चा सुरु आहे. त्यांच्यासोबत एक फेरी अंतिम टप्प्यात गेली होती, पण अचानक त्यांनी महापौर पद मागितले. पण त्याऐवजी आम्ही उपमहापौर पद आणि स्थायी समितीवर पहिल्या आणि चौथ्या वर्षी देण्याचा निर्णय घेतला. पाचशे रुपयांचे स्पँम्प पेपरही घेतले होते. अॅग्रीमेंट होणार होते, पण नंतर ते म्हणाले, “आम्ही आमच्या वरिष्ठांसोबत बोलतो, आम्हाला महापौर पद पाहिजे, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. चंद्रपूर महापालिकेत हालचालींना वेग आला असून महापौर पदासाठी मोठी चढाओढ सुरू झाली आहे. हेही वाचा : Girish Mahajan post : “आंबेडकरी विचार आमच्या…” ; बाबासाहेबांचा उल्लेख टाळल्याने झालेल्या वादावर गिरीश महाजनांची पोस्ट चर्चेत! पुढे बोलताना मुनगंटीवार यांनी मोठा दावा केला. ते म्हणाले, काँग्रेसचे काही नगरसेवक जे आम्हाला भारतीय जनता पार्टीसोबत यायचे आहे, असे म्हणत आहेत. त्यामुळे आम्ही तांत्रिक बाजू तपासून पाहत आहोत. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे चर्चेअंती काय ठरते हे पाहणे महत्वाचे असणार आहे. यंदाची चंद्रपूर महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीत बॅकफुटवर गेलेल्या काँग्रेसने कमबॅक करत ६६ पैकी २७ जागांवर विजय मिळवला. यासोबतच या ठिकाणी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातच आरोप प्रत्यारोपाचे राजकारण रंगल्याचे पाहायला मिळाले. कुणाला किती जागा चंद्रपूर महापालिकेत सत्तास्थापनेच्या समीकरणावरून नजर टाकल्यास बहुतासाठी ३४ जागांचा आकडा असणे आवश्यक आहे. भाजपाचे या महापालिकेत २४ नगरसेवक आहेत, तर उद्धवसेनेचे ६ नगरसेवक आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडी दोन आणि अपक्ष दोन असे १० नगरसेवक होतात. भाजपाचे २४ आणि उद्धवसेना, वंचित, अपक्ष असे १० नगरसेवक मिळून ३४ चा आकडा सहज गाठणे शक्य आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या घडामोडी घडतात याकडे लक्ष असणार आहे. हेही वाचा : Tejashri Pradhan: “कोणीच तुमचा ऑरा कॉपी करू शकत नाही”; तेजश्री प्रधानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल