महापालिकेचा गलथान कारभार, आरोग्य सेविकापदाची भरती अचानक रद्द; परीक्षार्थींना मनस्ताप

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यसेविका (एएनएम) पदांची मुलाखतीद्वारे आज (दि. 16 आणि उद्या 17 मार्च) रोजी होणारी भरती प्रक्रिया होणार होती. मात्र प्रशासकीय कारणास्तव मंगळवारी भरती प्रकिया अचानक रद्द करण्यात आली. यामुळे गडचिरोली, मालेगावसह राज्यातील विविध भागातून आलेल्या परीक्षार्थींनी मनस्ताप सहन करावा लागला. आज (बुधवार) सकाळीच महापालिका भवन परिसरात परिक्षार्थी जमा झाले होते. वेळेत माहिती न मिळाल्याने महापालिकेच्या या गलथान कारभाराचा परीक्षार्थींना आर्थिक आणि मानसिक मनस्ताप सहन करावा लागला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यसेविका (एएनएम) या रिक्त पदासांठी 7 मार्च रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार 16 व 17 मार्च रोजी आरोग्य सेविका या पदाकरिता थेट मुलाखती चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासकीय कारणास्तव ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मंगळवारी सायंकाळी अचानक जाहीर केले.
दरम्यान, परीक्षा रद्दच करायची होती तर दोन दिवसांपूर्वी जाहीर करणे गरजेचे होते. जेणेकरून राज्यातील विविध भागातून येणाऱ्या परीक्षार्थींना याची माहिती मिळाली असती. मात्र, एक दिवस अगोदर परीक्षा रद्द झाल्याचे जाहीर केल्याने अनेक परीक्षार्थींना याची माहितीच मिळाली नाही. त्यामुळे परीक्षार्थींनी आज (बुधवार) सकाळीच महापालिका भवन परिसरात जमा झाले होते. महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराचा परीक्षार्थींना मानसिक आणि आर्थिक मनस्ताप सहन करावा लागला आहे.
याबाबत अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे म्हणाले” काल दुपारी परीक्षा रद्द करण्याची मान्यता
मिळाली. त्यानंतर त्वरित प्रेसनोट आणि महापालिका संकेतस्थळावर टाकण्यात आली. तसेच ज्या ठिकाणी परीक्षा तेथे एक फ्लेक्स लावून परीक्षा रद्दची माहिती जाहीर केली आहे. व्हाट्सऍपच्या विविध ग्रुपवर परीक्षा रद्द करण्यात आल्याबाबत माहिती टाकण्यात आली.”





