Pune : वेतनविनाच काम करण्याची वेळ

पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत नेमण्यात आलेल्या ५१९ कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून वेतनच मिळालेले नाही. त्यामुळे हे कर्मचारी हतबल झाले असून, महापालिकेकडे वेतनाची मागणी केली जात आहे. या कर्मचाऱ्यांना जानेवारी ते मार्च २०२५ या तीन महिन्यांचे वेतन मिळालेले नाही.
दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून शासनाकडे या वेतनाच्या निधीची मागणी केली असून, हा निधी प्राप्त होताच तत्काळ वेतन दिले जाणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांंगण्यात आले. मात्र, वेतन नसल्याने या कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, हे कर्मचारी चांगलेच हतबल झाले आहेत.
महापालिकेकडून राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नेमले जातात. त्याअंतर्गत पुणे महापालिकेसाठी ७५६ कर्मचारी मंजूर असून, महापालिकेने ५१९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शहरात केंद्रशासन व राज्यशासनाच्या लसीकरण मोहीम, माता जननी सुरक्षा कार्यक्रम, साथीचे आजार तसेच इतर आजारांचे सर्वेक्षण, आरोग्याशी संबधित सर्वेक्षण अशी कामे केली जातात.
तसेच, आरोग्य विभागाकडे कर्मचारी संख्या कमी असल्याने महापालिकेच्या अनेक उपक्रमांची जबाबादारीही या कर्मचाऱ्यांवर आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत शासनाकडून या कर्मचाऱ्यांचे वेतन नियमितपणे दिले जात होते. मात्र, विधानसभा निवडणूकीपूर्वी राज्यात लाडकी बहीण योजनेची घोषणा आणि त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आल्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रक्कम नियमितपणे दिली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहराच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत महापालिकेकडे विचारणा करण्यात आल्यानंतर शासनाकडून निधी प्राप्त होताच वेतन देण्याचे उत्तर कर्मचाऱ्यांना मिळत आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या कर्मचाऱ्यांचे वेतन शासनाकडून देण्यात येते. त्याबाबत राज्यशासनाकडे पत्र पाठविण्यात आले आहे. त्यानुसार, निधी प्राप्त होताच तत्काळ वेतन दिले जाईल. महापालिकेकडून त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. – मनीषा नाईक ( सहायक आरोग्य प्रमुख)
लाडक्या बहिणीचा फटका….
सरकारच्या लाडक्या बहीण योजनेच्या घोषणेपासून आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. महापालिकेच्या अतिरिक्त कामाचा भार सहन करीत असताना वेतनविना काम करण्याची वेळ कामगारांवर आली आहे.





