महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर! १३ प्रभागांच्या हद्दीत मोठे बदल ; तुमचा प्रभाग बदलला का?

प्रभात वृत्तसेवा
पुणे : राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी प्रभाग रचनेस मान्यता दिल्यानंतर महापालिकेने शनिवारी अंतिम प्रभाग रचना जाहीर केली. अंतिम प्रभाग रचनेत ८ प्रभागांच्या नावात तर १३ प्रभागांच्या हद्दीत किरकोळ तसेच काही मोठे बदल केले आहेत. आता प्रभाग रचनेनंतर इच्छुकांना प्रभाग आरक्षण सोडतीचे वेध लागले आहेत.
हे झालेत बदल..
हरकतींमध्ये प्रभाग क्र. ४ खराडी-वाघोली, प्रभाग ३४ नर्हे-वडगाव बुद्रुक आणि प्रभाग क्र. ३८ आंबेगाव-कात्रज या प्रभागांवर मोठ्या प्रमाणात हरकती आल्या होत्या. या प्रभागांच्या हद्दीतच सर्वाधिक बदल केले आहेत. प्रभाग ४ मध्ये खराडी गावठाण शेजारील थिटे वस्तीचा भाग जोडण्यात आला आहे. प्रभाग ३४ मधील कोळेवाडी, जांभूळवाडी तसेच आंबेगावचा काही भाग वगळून तो प्रभाग ३८ ला जोडला आहे.
यामुळे प्रभागांच्या लोकसंख्येच्या मर्यादेत बदल झाले असून निवडणूक आयोगाने त्यास मान्यता दिली आहे. या प्रभाग रचनेत प्रभाग २४ कमला नेहरू हॉस्पिटल-रास्ता पेठ हा मोठ्या राजकीय चर्चेचा ठरला होता. मात्र या प्रभागाच्या हद्दीत किरकोळ बदल करण्यात आला असून मंगळवार पेठेचा काही भाग वगळला आहे.
आता आरक्षण सोडतीकडे लक्ष..
प्रभाग रचना अंतिम झाल्याने निवडणुकीचा एक टप्पा पार पडला असला तरी आता प्रभागांच्या आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकांसाठी १६५ सदस्य असणार असून ४० प्रभाग चार सदस्यांचे, तर एक प्रभाग पाच सदस्यांचा आहे. या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण आहे. त्यापैकी एससी प्रवर्गासाठी १३ टक्के, एसटी प्रवर्गासाठी २ टक्के तर ओबीसीसाठी २७ टक्के आरक्षण आहे.
त्यामुळे कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण पडणार यावर इच्छुकांची गणिते ठरणार आहेत. प्रामुख्याने इच्छुकांना स्वतः लढायचे की घरातील महिलेला उमेदवारी द्यायची, यासाठी आरक्षणाचा टप्पा महत्त्वाचा आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार येत्या सोमवारी (दि. ६) आरक्षण सोडतीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. १० ते १२ ऑक्टोबर दरम्यान ही सोडत काढली जाण्याची शक्यता आहे.
प्रभातच्या वृत्तावर शिक्कामोर्तब..
महापालिकेची प्रभाग रचना ४ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असल्याचे तसेच १४ ते १५ प्रभागांच्या हद्दीत बदल करण्यात आल्याचे वृत्त दैनिक प्रभातने सर्वप्रथम दिले होते. या दोन्ही वृत्तांवर शिक्कामोर्तब झाले आहे. हरकती आणि सूचनांच्या सुनावणीनंतर प्रभाग रचनेवर आलेल्या ५ हजार ९२२ हरकतींपैकी १,३२९ हरकती पूर्णत: मान्य करण्यात आल्या असून ६९ हरकती अंशत: मान्य करण्यात आल्या आहेत, तर ४,५२४ हरकती अमान्य करण्यात आल्या आहेत.





