मुंढवा चौक विस्तारीकरण रखडले

मुंढवा (मनोज गायकवाड) – पुणे-सोलापूर महामार्ग परिसर, पुणे स्टेशन परिसर आणि पुणे-नगर महामार्ग जोडणारा महत्त्वाचा चौक असलेल्या मुंढवा येथील महात्मा फुले चौकाचे विस्तारीकरणासह येथे येणाऱ्या रस्त्यांचेही रूंदीकरण होणे गरजेचे आहे. याबाबतच प्रस्ताव महानगरपलिकेसह बांधकाम विभागाकडे प्रस्तावित आहे. नागरिक जागा देण्यास तयार आहेत. परंतु, भुसंपादनाचा प्रश्न “ताबा पावती’ तसेच नुकसान भरपाईच्या मुद्यावर अडकला आहे.
मुंढवा चौक वाहतुकीच्या तुलनेत चौक तसेच रस्ते लहान पडत असल्याने या चौकासह जोडणाऱ्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. सकाळी तसेच संध्याकाळच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा असल्याचे चित्र मुंढवा चौकासह मुळामुठा नदीवरील पुलावर दिसते.
पुणे-सोलापूर तसेच पुणे-नगर या महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या मुंढवा येथील चौकाचीच “कोंडी’ होत आहे. हडपसरच्या बाजुने ऍमेनोरा येथून पुलावरून येताच थेट चौकात येणे अपेक्षित असताना जुना रस्ता गावाकडे तर एक वळण चौकाकडे जाते, याठिकाणी रस्ता अरूंद असल्याने वाहतूक कोंडी होते.
केशवनगर, मांजरी बाजुने चौकात येतानाही रस्ते अरूंद आहेत तसेच खराडी येथून मुळामुठा नदीपुलावरून चौकात सरळ दिशेने येताना रस्ता अरूंद होत जातो. एकुणच या चौकाची चोहोबाजुकडून कोंडी होत आहे. सर्वच बाजुने वाहतूक कोंडी होत असल्याने चौकातील सिग्नल सुटल्यानंतर वाहनांना मिळणारा वेळ कमी असल्याने चौकातही वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी महात्मा फुले चौकाचे विस्तारीकरणासह रस्त्याची कामे होणे गरजेचे ठरत आहे.
कोणता पर्याय योग्य?
मुंढवा चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपूल तसेच ग्रेड सेपरेटर, असे पर्यायही सूचविण्यात आले आहेत. परंतु, ताडीगुत्ता येथील रेल्वे उड्डाणपूल, ऍमनोरा पार्ककडे जाणाचा रेल्वे उड्डाणपूल तसेच खराडी येथील वाहतुकीसाठी केलेला मुठामुठा नदीवरील उड्डाणपूल पाहता मुुंढवा चौकात घोरपडीकडून केशवनगर, मांजरीकडे जाण्यासाठीच उड्डाणपूल तयार होऊ शकतो, असे अभियंत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुंढवा चौकातील वाहतूक कोंडीवर कोणता पर्याय योग्य ठरणार, याबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे.





