Pune : कोरेगाव पार्क, मुंढव्यात नियमबाह्य वृक्षतोड?

पुणे : शनिवारी कोरेगाव पार्क आणि मुंढवा भागांत रस्ता रुंदीकरणावेळी १० ते १२ झाडांची नियमबाह्य वृक्षतोड झाल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. नियमानुसार या वृक्षतोडीवेळी पालिकेचा अधिकारी उपस्थित असणे बंधनकारक आहे. वृक्षांचे पुनर्रोपन करणे अपेक्षित असताना किंवा किमान त्या वृक्षतोडीच्या बदल्यात वृक्ष लागवड करणे अपेक्षित असताना नियमाचे पालन न झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
या घटनेविरोधात तक्रार करणाऱ्या विजया सुरतकल म्हणाल्या, की शनिवारी दुपारी एबीसी फार्मच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू होती. त्याबद्दल तिथे काम करणाऱ्या कामगारांना प्रश्न विचारले असता, त्यांनी अर्धवट कागदपत्र सादर केली. त्यातून या वृक्षतोडीत मोठ्या प्रमाणात त्रुटी आणि विसंगती असून, वृक्ष संरक्षण आणि संवर्धन कायदा धाब्यावर बसविल्याचे लक्षात येत आहे.
वृक्षतोड होत असताना पुणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाचे अधिकारी उपस्थित असणे बंधनकारक असते. मात्र, कोणीही तिथे नव्हते. शिवाय वृक्षतोडीच्या अर्जावर फक्त एकाच तज्ज्ञाची स्वाक्षरी होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या २०१३ च्या एका निर्णयानुसार किमान तीन तज्ज्ञांची स्वाक्षरी गरजेची आहे. याशिवाय अनेक नियमांचे उल्लंघन या वेळी झाले आहे. त्यात कामगारांकडे वृक्षतोडीचा कार्यआदेश आणि प्रवास परवाना देखील नव्हता, सुरतकल पुढे म्हणाल्या.
यातून हे स्पष्ट होते की पथविभागाने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. शिवाय या वृक्षतोडीसंदर्भात झालेल्या आक्षेप सुनावणीनुसार पहिले, तर ही वृक्षतोड होऊ नये. आवश्यकता पडल्यास या वृक्षांचे पुनर्रोपण करणे आणि या वृक्षतोडीच्या भरपाईसाठी काही झाडांची लागवड करणे आवश्यक होते, असा दावा करत याविरोधात मुंढवा पोलीस स्थानकांत तक्रार दाखल केल्याची माहिती सुरतकल यांनी दिली.





