Pankaja Munde | Dhananjay Munde – भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा मंगळवारी 11वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने परळीतील गोपीनाथगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या विशेष दिवशी एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला, पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी तब्बल 11 वर्षांनी एकत्र गोपीनाथगडावर हजेरी लावली. राज्याच्या राजकारणात मोठे लक्ष वेधून घेतलेल्या या उपस्थितीमुळे गोपीनाथगडाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मंत्रीपद गमावल्यानंतर धनंजय मुंडे काय बोलणार याकडे विशेष लक्ष होते,मात्र त्यांनी या कार्यक्रमातही माध्यमांशी संवाद टाळला. दुसरीकडे, पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या, आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले. यावेळी बोलताना पंकजा म्हणाल्या, धनंजय मुंडे यांना विचारले मात्र ते म्हणाले आमच्या सगळ्यांच्यावतीने तूच बोल. आजपर्यंत मला साथ दिलेल्या, जीवनामध्ये मी माझ्या पायांवर उभे राहत असताना ज्यांनी ज्यांनी मला साथ दिली, पाठीशी उभे राहिले त्यांचे मी हात जोडून मी आभार व्यक्त करते. हे एक कुटुंब आहे. दरवर्षी काय करावे असा प्रश्न पडतो. ज्या बापाला जखम झाली म्हणून कळले असते. तर या देशात इतक्या लोकांनी रक्त दिले असते. त्याचा एक इतिहास तयार झाला असता. त्याच आठवणीत मी रक्तदान शिबीर घेते, मी देखील इथे रक्तदान करते. जर त्यांना रक्त लागले असते तर आपण कमी पडू दिले असते का? असा भावनिक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या कार्यक्रमामधून आम्ही गोपीनाथ मुंडे यांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो, असेही त्या पुढे म्हणाल्या.