Hindu-Muslim unity : मुंब्र्यात २० फुटी बाप्पाची मूर्ती कोसळणार तेवढ्यात…; मुस्लिम तरुणांनी जे केलं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र करेल सलाम!
Hindu-Muslim unity : मुंब्र्यात २० फूट गणेशमूर्तीची ट्रॉलीचे चाक तुटल्याने संकट निर्माण झाले. मुस्लिम तरुणांनी चार तास आधार देत गणरायाची मूर्ती सुरक्षित ठेवली.

Hindu-Muslim unity : मुंब्र्यात हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि माणुसकीचे दर्शन घडवणारी घटना समोर आली आहे. शंकर नगर परिसरातून भिवंडीतील पद्मानगर येथील गणेश मंडपाकडे २० फूट उंच गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या ट्रॉलीचे दाभोळकर नाक्यावर अचानक चाक तुटले. त्यामुळे ट्रॉलीचा तोल जाऊन गणेशमूर्ती पलटी होण्याचा धोका निर्माण झाला.
परिस्थितीची माहिती मिळताच मुंब्र्यातील मुस्लिम तरुण मदतीसाठी धावून आले. आरिफ सय्यद, बासित शेख यांच्यासह अनेक तरुणांनी सुमारे चार तास ट्रॉलीला आधार देत गणेशमूर्ती सुरक्षित ठेवली. मूर्तीला कोणतीही इजा होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
त्यानंतर क्रेनच्या मदतीने २० फूट उंच गणेशमूर्ती सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आली. नवीन ट्रॉलीची व्यवस्था झाल्यानंतर मूर्ती पुन्हा प्रतिष्ठापित करण्यात आली. त्यानंतर गणरायाचा पुढील प्रवास सुरू झाला.
दरम्यान, गणेशमूर्ती रवाना करताना मुस्लिम तरुणांनी श्रीफळ अर्पण करून गणरायाला निरोप दिला. धर्माच्या सीमा बाजूला ठेवून संकटाच्या वेळी माणुसकीला प्राधान्य देणाऱ्या या तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या घटनेने मुंब्र्यातील हिंदू-मुस्लिम एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश अधोरेखित केला आहे.





