Miraj News : मिरजेत गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करा; पोलीस उपअधीक्षक अजय कोकाटे यांचे आवाहन
मिरज शहरात गणेशोत्सव शांततेत, उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्याचे (Miraj News) आवाहन मिरज येथील पोलीस उपअधीक्षक अजय कोकाटे यांनी गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना केले.

Miraj News : मिरज शहरात गणेशोत्सव शांततेत, उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्याचे (Miraj News) आवाहन मिरज येथील पोलीस उपअधीक्षक अजय कोकाटे यांनी गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना केले. गणेशोत्सव आगमन आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्यात यावे, तसेच ध्वनीची निर्धारित मर्यादा काटेकोरपणे पाळावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
मिरज शहरात (Miraj News) आयोजित गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजय कोकाटे मार्गदर्शन करत होते. मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्यासह पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. पारंपरिक वाद्ये असतील तरच आगमन मिरवणुकीला परवानगी दिली जाईल, असे अजय कोकाटे यांनी स्पष्ट केले.
मिरवणुकीदरम्यान ध्वनीची मर्यादा ओलांडल्यास कारवाई केली जाऊ शकते, त्यामुळे मंडळांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. मिरजेत गणेशोत्सव आणि मिरवणुकीदरम्यान ध्वनीवर्धकांच्या वापराबाबतही पोलिसांनी स्पष्ट भूमिका मांडली. एक बेस आणि एक टॉप यालाच परवानगी दिली जाणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे मंडळांनी नियमांचे उल्लंघन करुन अतिरिक्त ध्वनी यंत्रणा लावू नये, अशा सूचना देण्यात आल्या.
गणेशोत्सवाच्या नावाखाली नागरिक, व्यापारी किंवा दुकानदारांकडून जबरदस्तीने वर्गणी मागणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला. जबरदस्तीने वर्गणी मागितल्याचे आढळल्यास संबंधितांवर खंडणीचे गुन्हे दाखल केले जातील, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
गणेशोत्सव मंडळांनी उत्सव साजरा करताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी घ्यावी. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी मिरज वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत तिप्पे, नगरसेवक मोहन वाटवे, नगरसेवक दयानंद खोत, सूर्यकांत शेंगणे, विनायक मेंढे, नाना हलवाई, जितेंद्र ढोले, मारुती नाईक, शीतल पाटोळे, विकास कुलकर्णी, शंकर परदेशी, राजू खोत, सुधीर अवसरे, संतोष शिंदे यांच्यासह विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते. पोलिसांच्या सूचनांचे पालन करत गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
गुन्हेगारांचे फोटो असलेल्या फलकाला परवानगी नाही
गणेशोत्सवाच्या काळात डिजिटल बोर्ड तसेच फलकांवर गुन्हेगारांचे किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीला (Miraj News) प्रोत्साहन देणारे फोटो लावण्यास परवानगी दिली जाणार नाही, असेही उपअधीक्षक अजय कोकाटे यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सव हा सामाजिक आणि धार्मिक उत्सव असून त्याला कोणत्याही प्रकारे गुन्हेगारीचे स्वरूप येऊ नये, यासाठी मंडळांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.






