मुंबईकर एकच दिवस फोडू शकणार फटाके ; लक्ष्मपूजनाचा दिवस वगळता फटाक्यांवर बंदी

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लक्ष्मपूजनाचा दिवस वगळता फटाक्यांवर बंदी घातली आहे. लक्ष्मीपूजनाला केवळ खासगी क्षेत्रात सौम्य स्वरुपाच्या फटाक्यांना परवानगी असेल. सार्वजनिक ठिकाणी फटाके किंवा आतषबाजीला बंदी असेल. मुंबई महापालिकेने याबाबत नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर साथरोग नियंत्रण कायदा-1897 अंतर्गत कारवाई केली जाईल, असे महापालिकेने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरा होणाऱ्या यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी कोविड विषयक प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे मुंबई महापालिकेने म्हटले आहे. फटाक्यांच्या धुराचा कोरोनाबाधित रुग्णांना त्रास होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिका क्षेत्रात फटाके फोडणे किंवा आतषबाजी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मुंबईकरांना केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी खासगी क्षेत्रात सौम्य स्वरुपाचे फटाके म्हणजेच फूलबाजी, अनार, भुईचक्र यांसारखे फटाके फोडता येणार आहेत.
* मुंबई महापालिकेची फटाकेबाबत नियमावली….
* ‘कोविड – 10’ बाधित रुग्णांमध्ये श्वसनाचा मुख्य प्रश्न असतो आणि त्यांची प्राणवायू पातळी खालावण्याची संभाव्यता असते; ही संभाव्यता लक्षात घेऊन आणि फटाक्यांच्या धुराचा कोविड रुग्णांना त्रास होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक परिसर, खासगी परिसर इत्यादी सर्व ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाही किंवा तत्म स्वरुपाची आतषबाजी महापालिका क्षेत्रात कुठेही करता येणार नाही.
* हॉटेल, क्लब, जिमखाना, संस्था, व्यावसायिक परिसर, विविध समूह इत्यादींद्वारे आणि त्यांच्याशी संबंधित परिसरांमध्ये कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत किंवा तत्सम स्वरुपाची आतषबाजी आणि त्या संबंधिचे कार्यक्रम करता येणार नाहीत.
* वरील दोन्ही बाबत नियमभंग करणाऱ्यांवर महानगरपालिका आणि पोलिसाद्वारे संयुक्तपणे कडक कारवाई करण्यात येईल.
* मात्र दिनांक 14 नोव्हेंबर 2020 रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी केवळ सोसायटीचे अंगण/घराचे अंगण इत्यादी खासगी परिसरांमध्येच सौम्य स्वरुपाचे फटाके जसे की, फुलबाजी (फुलझडी), अनार (कोठी/ झाड) यासारखेच फटाके फोडण्यास मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात येत आहे. मात्र, हे करताना नागरिकांनी ‘कोविड’ विषयक आवश्यक ती खबरदारी कटाक्षाने घ्यायची आहे. यामध्ये प्रामुख्याने मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्स पाळणे आणि साबणाने हात स्वच्छ धुणे इत्यादी बाबींची काळजी घ्यायची आहे.
* ‘कोविड’च्या अनुषंगाने हात स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे सॅनिटायजर हे ज्वलनशील असण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन दिवाळीचे दिवे लावताना, मर्यादित स्वरुपात आतषबाजी करताना आणि फटाके फोडताना हाताला सॅनिटायजर लावलेले नसल्याची खात्री करुन घ्यावी. या प्रसंगी सॅनिटायजरच्या संपर्कात येणे टाळावे किंवा सॅनिटायजरचा वापर करु नये. तसेच सॅनिटायजरची बाटली अगर कुपी आपल्याजवळ बाळगू नये.
* वरील संदर्भानुसार या प्रसंगी खबरदारीची उपाययोजना म्हणून हात स्वच्छ करताना सॅनिटायजरऐवजी साबण आणि पाण्याने हात योग्यप्रकारे आणि नियमितपणे धुण्यास प्राधान्य द्यावे.
* वर नमूद केल्यानुसार केवळ दिनांक 14 नोव्हेंबर 2020 रोजी संध्याकाळी लहान मुले फुलझडी अगर अनार फटाके फोडणार असल्यास ती पालकांच्या/मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली करणे बंधनकारक आहे. तसेच अशावेळी पाण्याने भरलेली मोठी बादली, साबण आणि सुती रुमाल अगर पंचा सोबत असावा.





