Mumbai Rain Update : मुंबईच्या पावसात अडकले मंत्री, आमदार…; रेल्वे ट्रॅकवरून चालण्याची आली वेळ

Mumbai Rain : राजधानी मुंबईत कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बस आणि मुंबईची जीवनवाहीनी मानली जाणारी लोकलसेवाही विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. शहराच्या अनेक भागांत आजही म्हणजे सोमावारी पाऊस सुरू होता व अनेक ठिकाणी पाणी साचले होते.
हवामान खात्याकडून सोमवारी दिवसभर पावसाची शक्यता अगोदरच वर्तवण्यात आली होती. शहरात काल रात्री आठ वाजेपासून आज सकाळी आठ वाजेपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सामान्य नागरिकांचे चांगलेच हाल झाले आहेत. जोरदार पावसामुळे रेल्वे देखील रद्द झाल्या असून प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली.
तर दुसऱ्या बाजूला विधीमंडळाचं अधिवेशन चालू असल्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांमधून मुंबईकडे येणारे आमदार आणि मंत्री देखील या पावसात अडकले आहेत. त्यामुळे त्यांनाही विधीमंडळ गाठणं अवघड झालं आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह अनेक आमदार रेल्वेने मुंबईला येत होते.
मात्र ते ज्या एक्सप्रेसने मुंबईला येत होते, ती एक्सप्रेस कुर्ला आणि दादरच्या मध्ये अडकल्याने इतर प्रवाशांप्रमाणे मंत्री व आमदार रेल्वेतून खाली उतरले आणि रेल्वे रूळावरून चालत मुंबईच्या दिशेने निघाले. मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांना कुर्ला पोलिसांच्या बिट चौकीत काढावे लागले आहे.
तर काही अंतर रेल्वे रुळावरुन पार करावे लागले आहे. सिधेश्वरी एक्सप्रेस ने ही नेतेमंडळी मुंबईकडे येत होती. या वेळी लोकल विद्याविहार च्या पुढे जाईना, त्यामुळे हे दोघे ही रेल्वेतून उतरले आणि त्यानी कुर्ला रेल्वे स्थानक गाठले. तिथे खूप वेळ बसल्यानंतर आता ते पोलीस वाहनातून मुंबईकडे रवाना झाले.
मुंबईतील पावसाचा मंत्री हसन मुश्रीफ यांना देखील फटका बसला आहे. कल्याणमध्ये महालक्ष्मी एक्स्प्रेस थांबून राहिली होती. त्यानंतर हसन मुश्रीफ महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून उतरले आणि मित्राच्या गाडीतून विधानभवनाकडे रवाना झाले.





