Mumbai Rain: मुंबईला अतिवृष्टीचा इशारा ! रेल्वे वाहतूक खोळंबली, प्रवाशांचे हाल

Mumbai Rain : मुंबई शहर आणि उपनगराला काही दिवसांपासून पावसाने झोडपून काढले आहे. हवामान विभागानेही शुक्रवारी (ता. 26 जुलै) सकाळपर्यंत मुंबईला पावसाचा रेड अलर्ट अर्थात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
त्यामुळे मुंबईकरांनी आवश्यकता असेल तरच घराच्याबाहेर पडावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. गेल्या 24 तासांमध्ये हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात 62.5 मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात 68.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, शुक्रवारी 26 जुलैला असल्याकारणाने आज पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे 26 जुलै 2005 ला आलेल्या पुराची आठवण ताजी होऊ लागली आहे.
26 जुलै 2005 या दिवशी मुंबईकरांनी पावसाचे रौद्ररुप पाहिले होते. त्या दिवशी मुंबईत दुपारपासून मुसळधार पावसाने थैमान घातले. ज्यानंतर संपूर्ण मुंबई जलमय झाली होती.
रेल्वे गाड्या रद्द; प्रवाशांचे हाल….
मुंबईतही मुसळधार पाऊस असून कल्याण, ठाणे आणि परिसरात पावसाच्या पाण्यामुळे नद्यांना पूर आला आहे. बदलापूरजवळील उल्हास नदीला पूर आला असून रस्तेही जलमय झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कर्जत ते कल्याण मार्गावरील काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
दरम्यान, कल्याणमधील शिवाजीनगर परिसरामध्ये वालधुनीच्या कडेला असणाऱ्या 200 हून अधिक घरांमध्ये पाणी शिरले असून येथील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.





