Mumbai Rain । मुंबईत पावसामुळे हाहाकार..! CM शिंदेंनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा; म्हणाले, ‘मुंबईकरांनो…’

Eknath Shinde । Mumbai Rain Alert Update | मुंबईत काल रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. तर मुसळधार पावसामुळे लोकल सेवा देखील ठप्प झाली आहे.
आजही सकाळपासून मुंबईत पाऊस सुरू असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी, मुंबईतील सर्व BMC, सरकारी आणि खाजगी शाळा आणि महाविद्यालयांना पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
आजही हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली असल्याने परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्रांसाठीचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. सखल भागात पाऊस बरसत असल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “राज्यासह मुंबईत पाऊस सुरु आहे. एकत्रित मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने राज्यात काही ठिकाणी समस्या निर्माण झाल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी सर्व जिल्हास्तरावरील टीम एकत्रित काम करत आहेत. या पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा प्रभावित झालेली आहे.
यावेळी पावसामुळे कोणते रस्ते बाधित झाले आहेत त्यांची माहिती घेतली, वाहतूक चालू रहावी, ज्या सखल भागात पाणी साचले आहे तिथे पंप लावून पाणी काढून टाकावे, जिथे रेल्वे सेवा बाधित झाली आहे तिथे बेस्ट बसेसची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश दिले. तसेच आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी… https://t.co/l46EAE2TR4 pic.twitter.com/aaGAhGXrzC
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 8, 2024
लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना एसटीसह बेस्टच्या सेवा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईत पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याकरिता मुंबई महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
पावसामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यामुळे नागरिकांनी गरजेशिवाय बाहेर पडू नये”, असे आवाहन एकनाथ शिंदेंनी दिली आहे.
मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आज मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन आढावा घेतला.
यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त… pic.twitter.com/6ii9GnUJeR
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 8, 2024
पूरस्थितीवर मात कशी करणार?
एकनाथ शिंदे म्हणाले, पाण्याचा निचरा व्हावा यासाठी आपण मोगरा पंपिंग स्टेशन, माहुल पंपिंग स्टेशन सुरू करत आहोत. यासह मिठी आणि पोईसर नदीची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवायची आहे. या भागात अतिक्रमणं वाढली होती, यावर आपण कारवाई केली आहे.
यासह नद्यांचं आणि नाल्यांचं रुंदीकरण करण्याची आवश्यकता आहे. आपण लवकरच ही कामं हाती घेऊ. पाऊस पडल्यानंतर सर्व पाणी नाल्यावाटे समुद्रात जातं. त्यामुळे या नाल्यांचं रुंदीकरण करणार आहोत.
तसेच आपण ठिकठिकाणी पंप आणि फ्लड गेट बसवणार आहोत. जेणेकरून आपण शहरातील पाणी समुद्रात फेकू शकतो. मात्र या फ्लडगेटमुळे समुद्रातील पाणी शहरात घुसणार नाही, अगदी भरतीच्या काळातही हे पाणी शहरात घुसणार नाही. त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर मदत मिळेल.
कोकणात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट जारी, काही ठिकाणी २०५ मिमीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यासाठी आॅरेंज अलर्ट देण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह वाऱ्यांचा वेग ५०-६० किमी प्रति तास राहण्याचा अंदाज आहे. तर उद्या देखील कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस सांगितला आहे.
रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद
या घटनेच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडावर जाणाऱ्या वाटा बंद केल्या आहेत. मुसळधार पावसात गडकिल्ल्यांवर चढण्याचं धाडस करू नये, असं आवाहनही सध्या करण्यात येत आहे. आजपासून अर्थात 8 जुलैपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.
तसेच रायगड किल्ल्यावर जाणारा रोप वे आणि पायरी मार्ग बंद करण्यात आला आहे. तर किल्ल्यावर पायी जाणाऱ्या चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा मार्गावर बॅरीकेटिंग करण्यात आली आहे. रविवारी संध्याकाळी रायगडावर निर्माण झालेल्या ढगफुटी सदृष्य परिस्थितीनंतर जिल्हा प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, रागयड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यात सरासरी 77 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने आज येथे अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.





