मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात ! कोंबड्यांनी भरलेला टेम्पो अन् ट्रकची जोरात टक्कर, चालकाचा मृत्यू

Mumbai Pune Road Accident । मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर काल रात्री भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो मागच्या बाजूने एका ट्रकवर जाऊन आदळला. ही धडक इतकी भीषण होती की, टेम्पोच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात झाला.
दोन्ही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी Mumbai Pune Road Accident ।
मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर ट्रक आणि टेम्पोची धडक झाली. अपघातग्रस्त ट्रकमधून साखरेची वाहतूक केली जात होती. या ट्रकवर मागच्या बाजूने कोंबड्यांनी भरलेला टेम्पो जोरात येऊन धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की, टेम्पोच्या पुढील भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. या जोरदार धडकेमुळे ट्रक आणि टेम्पोला आग लागली. त्यामुळे ट्रकचा मागील भाग आणि टेम्पोचा पुढील भाग पूर्णपणे जळून खाक झाला. त्यामुळे टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल पनवेल येथे दाखल केले आहे.
आग लागल्याने मदतकार्यात अडचण
दोन्ही गाड्यांची धडक झाल्यानंतर कोंबड्यांच्या टेम्पोची पुढची बाजू पूर्णपणे चेपली गेली. त्यामुळे टेम्पो चालकाचा मृतदेह आतमध्ये अडकून पडला होता. याशिवाय, टेम्पोला अपघातानंतर आग लागल्याने मदतकार्य करताना अडचणींचा सामना करावा लागला. अखेर आग विझवल्यानंतर बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी टेम्पोचा पत्रा कापून चालकाला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
चेंदामेंदा झालेल्या टेम्पोची अवस्था पाहून या अपघाताच्या भीषणतेची कल्पना येऊ शकते. जोरदार धडकेमुळे टेम्पोमधील काही कोंबड्याही दगावल्या. काहीवेळापूर्वी हा टेम्पो रस्त्यातून दूर करण्यात आला आहे. या भागात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने बचावपथकातील कर्मचाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागला.
हेही वाचा
भाजप प्रवक्त्यांच्या यादीत उज्ज्वल निकम यांच्या नावाचा समावेश; सुषमा अंधारेंनी व्यक्त केला संताप





