Mumbai-Pune Expressway Toll : मोठा दिलासा! प्रवाशांना टोलचे पैसे परत मिळणार; तब्बल 32 तास मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडीत अडकलेले प्रवासी
Mumbai-Pune Expressway Toll : जवळपास 1.2 लाख प्रवाशांना सुमारे 5.16 कोटींचा टोल परतावा देण्याचा निर्णय

Mumbai-Pune Expressway Toll : मुंबई–पुणे एक्स्प्रेस वेवर 3 फेब्रुवारी रोजी खोपोली परिसरात गॅस टँकरचा अपघात झाला होता. या घटनेनंतर एक्स्प्रेस वेवर आणि जवळच्या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. तब्बल 32 तासांपेक्षा अधिक काळ वाहनांची लांबलचक रांग लागली होती.
या वाहतूक कोंडीत हजारो प्रवासी अडकून पडल्याने अनेकांना पाणी, अन्न तसेच इतर मूलभूत सुविधांचा अभाव सहन करावा लागला. मात्र असे असतानाही काही वाहनधारकांच्या FASTag खात्यांतून टोलची रक्कम वजा झाली होती. याच व्यवहारांची माहिती तपासून आता ती रक्कम परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तब्बल 1.2 लाख प्रवाशांना सुमारे 5.16 कोटींचा टोल परतावा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा परतावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) मार्फत देण्यात येणार आहे.
या आदेशानंतर आता येत्या काही दिवसांत संबंधित वाहनचालकांच्या FASTag खात्यांमध्ये थेट जमा केला जाणार आहे. ज्या वाहनधारकांकडून टोल वसूल झाला आहे, त्या सर्वांना पूर्ण परतावा दिला जाणार आहे.
या परताव्यात मुंबई–पुणे एक्स्प्रेस वेवर तसेच पुणे–बंगळुरू महामार्ग या मार्गांवरील टोलचा समावेश असणार आहे. टोल वसुली करणाऱ्या IRB Infrastructure Developers या कंत्राटदार कंपनीकडून FASTag व्यवहारांचा तपशील मागवण्यात आला होता.
राज ठाकरेंनीही केली होती टोलचे पैसे परत करण्याची मागणी
दरम्यान, मुंबई–पुणे एक्स्प्रेस वेवर त वाहतूक कोंडीची तात्काळ दखल घेत राज्य सरकारने महामार्गावरील टोल वसुली थांबवण्याचे निर्देश दिले होते. वाहतूक सुरळीत होईपर्यंत टोल वसूल करू नये असं सरकारने बजावले होते. मात्र तरीही फास्टॅगमधून अनेक वाहनचालकांचे पैसे कापले गेले.
या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही टोलचे पैसे परत करा अशी मागणी केली होती. अखेर आता 1.2 लाख प्रवाशांना 5 कोटींहून अधिक रक्कम परत मिळणार असल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा:






