पुणे : पंजाबमधील गायक, कॉंग्रेस नेता सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील संशयित तसेच मोक्का कायद्यान्वये कारवाई केल्यानंतर फरार गुंड सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाल याची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून गुरुवारी चौकशी करण्यात आली. मुुंबई पोलिसांचे पथक गुरूवारी पुण्यात चौकशीसाठी दाखल झाले.
दिल्लीतील गुंड लॉरेन्स बिष्णोई टोळीने अभिनेता सलमान खानला धमकी दिली होती. बिष्णोई टोळीने मुसेवालांची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मुसेवाला खून प्रकरणात संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ संशयित आरोपी आहेत. बिष्णोई टोळीने अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याअनुषंगाने मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी महाकाळ याची चौकशी केली.
मंचरमधील गुंड ओंकार उर्फ राण्या बाणखेले खून प्रकरणात संतोष जाधव याला सिद्धेश कांबळे उर्फ महाकालने आश्रय दिला होता. ग्रामीण पोलिसांनी त्याच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. पुणे ग्रामीण पोलिसांकडून बाणखेले खून प्रकरणाचा तपास सुरू आहे. सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी प्रकरणात मुंबई पोलीस तर मुसेवाला हत्या प्रकरणाचा तपास पंजाब पोलिसांकडून करण्यात येत आहे.
– अशोक शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा