Anmol Bishnoi : अनमोल बिष्णोई येणार भारताच्या ताब्यात; अमेरिकेतून करण्यात आले प्रत्यार्पण

मुंबई : गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल भारताच्या ताब्यात येणार आहे. विविध गंभीर गुन्ह्यांबद्दल वॉन्टेड असणाऱ्या अनमोलचे अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यात आले. आता तो उद्या (बुधवार) भारतात पोहचेल, अशी माहिती मुंबई पोलीस दलातील सुत्रांकडून देण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील अनमोल हा महत्वाचा आरोपी आहे.
त्याशिवाय, बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावरील गोळीबार प्रकरणीही तो पोलिसांना हवा आहे. अनमोल याच्या विरोधात देशात विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने रशियन पासपोर्ट मिळवला. तो अमेरिका आणि कॅनडामधील विविध ठिकाणी आश्रय घेऊन होता. काही दिवसांपूर्वी त्याला कॅनडात ताब्यात घेण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली.
त्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणासाठीचे दोन प्रस्ताव मुंबई पोलिसांनी पाठवले. आता अमेरिकेतून प्रत्यार्पण झाल्यानंतर अनमोल प्रथम दिल्लीत दाखल होईल. त्याला प्रथम कुठल्या यंत्रणेकडे सोपवायचे याविषयीचा निर्णय केंद्र सरकार घेईल, असेही सुत्रांनी नमूद केले.





