Mumbai News : रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत जोरदार राडा; वडाळ्यामधील धक्कादायक प्रकार

मुंबई : मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील वडाळ्यामध्ये आज रामनवमीनिमित्त रॅली काढण्यात आली होती. मात्र या रॅली दरम्यान जोरदार राडा झाल्याचे समजत आहे. या रॅलीदरम्यान पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. रॅलीदरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाल्याचे समजत आहे.
काय घडले नेमके?
रामनवमीनिमित्त विश्व हिंदू परिषदेकडून शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोभायात्रेला पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र तरीदेखील पोलिसांची परवानगी नसताना विश्व हिंदू परिषदेकडून रॅलीचं आयोजन करण्यात आलं. त्यामुळे जोरदार राडा झाला, पोलीस आणि विहिंपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप देखील कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.
या राड्यामध्ये काहीजण जखमी झाल्याचे समजत आहे. दरम्यान विनापरवानगी रॅली काढल्यामुळे काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यानंतर विहिंपच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली आणि जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर परिसरामध्ये पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. तसेच अनेक वरिष्ठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.





