करोना रुग्णांवर उपचारासाठी मुंबई महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई – मुंबईत दिवसेंदिवस करोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. सौम्य संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबईतील रुग्णालये फाईव्ह स्टार हॉटेल्सचा वापर करणार आहेत. आजपासून दोन हॉटेल्स खासगी रुग्णालयाचा भाग म्हणून काम करणार आहेत. यासंदर्भात मुंबई महापालिकेने परिपत्रक जारी केले आहे.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता खासगी रुग्णालय रुग्णांच्या उपचारासाठी ४ किंवा ५ स्टार हॉटेलचा वापर करणार आहे. यामुळे ज्या रुग्णांना बेडची सर्वाधिक गरज आहे, त्यांना बेड उपलब्ध होईल. तसेच ज्या रुग्णांना करोनाची लक्षण नाहीत, त्यांना या हॉटेलमध्ये ठेवण्यात येईल. त्यांच्यावर याच हॉटेलमध्ये उपचार केले जातील.
याशिवाय रिकव्हर होत असणारे आणि आयसीयु बेडची गरज नसणारे रुग्ण हॉटेल्समध्ये हलवले जाणार आहेत. याबाबत लवकरच खासगी रुग्णालय हॉटेलसोबत करार करण्यात येणार आहे. या सगळ्या कामांवर देरखेख ठेवण्यासाठी मुंबईच्या २४ वॉर्डांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
हॉटेल्सना करोना रुग्णांसाठी २० रुमची गरज असून याशिवाय २४ तास डॉक्टर, नर्स, औषधं आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध असेल. या सुविधेसाठी रुग्णालय चार हजारांपर्यंतचं शुल्क आकारु शकतात. जर रुग्णासोबत कोणी राहत असेल तर हे शुल्क सहा हजारांपर्यंत असेल.





