Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितु तावडेंच्या गाडीचा अपघात; तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या
Ritu Tawde : एकापाठोपाठ एक तीन गाड्या एकमेकांवर आदळल्याने काही काळ गोंधळ

Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितु तावडे ( Ritu Tawde )यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला आहे. एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला असून, सुदैवाने या घटनेत महापौर रितु तावडे किंवा इतर कर्मचारी जखमी झालेले नाहीत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सायन पोलीस ठाण्यामध्ये या अपघाताची रीतसर नोंद करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं? (Ritu Tawde)
महापौर रितु तावडे या दुपारी एका नियोजित कार्यक्रमासाठी आपल्या ताफ्यासह जात होत्या. सायन पुलावरून जात असताना अचानक ताफ्यासमोर एक दुचाकीस्वार आला. या दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी ताफ्यातील सर्वात पुढे असलेल्या एस्कॉर्ट गाडीच्या चालकाने तातडीने ब्रेक लावला.
एस्कॉर्टची गाडी अचानक थांबल्याने, त्यामागे असलेली महापौरांची मुख्य गाडी पुढच्या गाडीला जाऊन धडकली. त्यानंतर महापौरांच्या गाडीच्या मागे असलेल्या दुसऱ्या एस्कॉर्ट गाडीनेही समोरच्या वाहनाला जोरदार धडक दिली.
एकापाठोपाठ एक तीन गाड्या एकमेकांवर आदळल्याने काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र गाड्यांचा वेग मर्यादित असल्याने महापौरांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र या अपघातात महापौरांच्या गाडीचे आणि ताफ्यातील सुरक्षा वाहनांचं किरकोळ नुकसान झालं आहे.
दरम्यान, अपघातानंतर तातडीने पालिकेच्या ताफ्यातील दुसरी पर्यायी वाहने मागवण्यात आली. ज्यानंतर महापौर पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाल्या.
हेही वाचा:





