Devanandan Prasad Died: मध्यपूर्वेतील युद्धाने मुंबईकर कुटुंबाचा आधारस्तंभ हिरावून घेतला, इराणच्या ड्रोन हल्ल्यात अभियंत्याचा मृत्यू
Devanandan Prasad Singh Died in Iran Attack: बगदादमधील भारतीय दूतावासाने या दुःखद घटनेची पुष्टी केली आहे. शिपिंग कंपनीच्या व्यवस्थापनाने देवनंदन यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

Devanandan Prasad Singh Died in Iran Attack: मध्यपूर्वेतील युद्धाने आता एका मुंबईकर कुटुंबाचा आधारस्तंभ हिरावून घेतला आहे. कांदिवली (पूर्व) येथे राहणारे ५० वर्षीय अनुभवी सागरी अभियंता देवनंदन प्रसाद सिंह यांचा पर्शियन आखातात अमेरिकी मालकीच्या ‘सेफसी विष्णु’ या कच्च्या तेलाच्या जहाज टँकरवर इराणने केलेल्या पाण्याखालील ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाला. जहाजावरील अन्य १५ भारतीय खलाशांना मात्र सुरक्षितरीत्या वाचवण्यात आले आहे.
काय घडले?
दोन दिवसांपूर्वी इराणने पर्शियन आखातात इराकजवळ अमेरिकी मालकीच्या ‘सेफसी विष्णु’ या कच्च्या तेलाच्या टँकरवर पाण्याखालील ड्रोनने हल्ला केला. इराणने स्वतः हा हल्ला आपण केल्याचे जाहीरपणे मान्य केले. हल्ल्यात टँकरमध्ये जोरदार स्फोट होऊन आग लागली. सोशल मीडियावर आलेल्या व्हिडिओमध्ये रात्रीच्या अंधारात जहाजातून भयंकर ज्वाळा उठताना दिसत आहेत. या हल्ल्यात देवनंदन प्रसाद सिंह गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कोण होते देवनंदन?
देवनंदन प्रसाद सिंह मूळचे बिहारचे रहिवासी असून २०१९ मध्ये ते पत्नी आणि दोन मुलांसह मुंबईत स्थायिक झाले होते. ते ‘सेफसी विष्णु’ टँकरवर अतिरिक्त मुख्य अभियंता (सुपरिंटेंडेंट) या पदावर कार्यरत होते. अनेक वर्षांपासून कार्गो जहाजांवर काम करत त्यांनी सागरी क्षेत्रात मोठा अनुभव मिळवला होता. समुद्रातील दीर्घ प्रवासांदरम्यान जहाजांची तांत्रिक जबाबदारी ते सक्षमतेने सांभाळत होते.
हेही वाचा – इंडिगोचे तिकीट महागले; 425 ते 2300 इंधन अधिभार, 14 मार्चपासून लागू
‘पपांना फोन केला, पण उत्तर आलेच नाही’
हल्ल्याची बातमी कळताच देवनंदन यांच्या कुटुंबाने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मुलगी कोमल सिंह रडत रडत म्हणाली, “हल्ल्याची माहिती मिळताच आम्ही पपांना वारंवार फोन आणि मेसेज केले, पण कुठूनही उत्तर आले नाही. नंतर कळले की ते आता या जगात राहिले नाहीत.” देवनंदन यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. ही बातमी कळताच त्यांचे संपूर्ण कुटुंब पूर्णपणे कोसळून गेले आहे.
दूतावास आणि कंपनीने दुःख व्यक्त केले
बगदादमधील भारतीय दूतावासाने या दुःखद घटनेची पुष्टी केली आहे. शिपिंग कंपनीच्या व्यवस्थापनाने देवनंदन यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. जहाजावरील उर्वरित खलाशी सुरक्षित असून त्यांची काळजी घेतली जात असल्याचेही सांगण्यात आले आहे.





