Share Market : जागतिक शेअर बाजारातून नकारात्मक संदेश, निर्देशांक पिछाडीवर….

मुंबई – देशात आणि परदेशात आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे. सोमवारी जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आले. परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून विक्री चालूच असल्यामुळे शेअर निर्देशांकात बरीच घट नोंदली गेली. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज इत्यादी बड्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळवू शकणार नाही.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 450 अंकांनी कमी होऊन 78,248 अंकावर बंद झाला. सेन्सेक्स संदर्भातील 23 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. तर 7 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 168 अंकांनी म्हणजे 0.71 टक्क्यांनी कमी होऊन 23,644 अंकावर बंद झाला. सकाळपासूनच शेअर बाजारात विक्रीचे वातावरण होते.
रॅलीगेअर ब्रोकिंग कंपनीचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितले की, सकाळच्या सत्रात बर्यापैकी खरेदी झाली होती. मात्र जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आल्यानंतर बड्या कंपन्यांच्या शेअरची विक्री झाल्यामुळे निर्देशांक घसरले.
जिओजीत वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, डॉलर वधारत असल्यामुळे आणि अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून गुंतवणूक काढून घेऊन अमेरिकेत गुंतवणूक करीत आहेत. अशा परिस्थितीत निर्देशांकांना आधार मिळणे अवघड झाले आहे. मात्र अशा अवस्थेतही काही गुंतवणूकदार माहिती तंत्रज्ञान आणि औषधी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी करीत आहेत.
Budget 2025 | प्राप्ती करदात्यांना अर्थसंकल्पात दिलासा मिळण्याची शक्यता….
कोणत्या कंपन्या पिछाडीवर
टाटा मोटर्स, कंपनीच्या शेअरचा भाव सव्वादोन टक्क्यांनी कोसळला. टाटा स्टील, स्टेट बँक, महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. झोमॅटो, टेक महिंद्रा, एचसीएल टेक्नॉलॉजीज, इंडसइंड बँक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. स्मॉल कॅप 0.47 टक्क्यांनी कमी झाला. तर मिडकॅप 0.13% वाढला. धातू क्षेत्र पिछाडीवर होते. त्याचबरोबर सेवा, वाहन या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, आरोग्य या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.





