मुंबई तुमच्या नव्हे आमच्या बापाची ! जरांगेंना धमक्या देणे थांबवा अन्यथा वाईट परिणाम – दीपक केदार

– मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना मुंबईत येण्याचे आव्हान देणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांना धमकी देणे थांबवावे, अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतील, असे ते म्हणाले आहेत.
केदार म्हणाले, “मराठा बांधवांसाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांना धमकी देणारा हा लाड कोण आहे? या लाडची औकात काय? सरकारकडून टेंडर मिळवण्यासाठी पुढे पुढे करणारे हे. मराठवाड्यातल्या आंदोलकांना मुंबईला येऊन दाखव म्हणण्याची धमकी द्यायची लायकी किती आहे?”
जरांगे यांच्या समर्थनात बोलताना केदार म्हणाले, “मनोज जरांगे मराठवाड्यातला आणि महाराष्ट्रातला एक आंदोलक आहे, एका समूहासाठी लढतोय. आठरा पगड जातीच्या आर्थिक प्रगतीची भाषा करतोय आणि त्याला तुम्ही मुंबईमध्ये येऊन दाखवा अशी धमकी देता, लाज वाटली पाहिजे. हा निळा वाघ मनोज जरांगेच्या बाजूने उभा आहे.”
“तुम्ही शरद पवारांचा मुका घेणे बंद करा, हिम्मत असेल तर मुंबईत येऊन दाखवा”, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने जरांगे टीका करत असल्याने प्रसाद लाड जरांगेंना म्हणाले होते.





