Mumbai Indians : आयपीएल २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सुरुवातीला यश मिळाले होते, पण त्यानंतर सलग चार सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. मात्र, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबईने दमदार पुनरागमन केले. तिलक वर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने (Mumbai Indians) २०० धावांचे आव्हान गुजरातसमोर ठेवले होते. या आव्हानाचा बचाव करताना मुंबई इंडियन्सने ९९ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. या विजयाने मुंबईची गाडी पुन्हा विजयाच्या रुळावर आली आहे. या विजयानंतर मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू विल जॅक्स मुंबई इंडियन्स संघात परतला आहे. तो चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणाऱ्या पुढील सामन्यात खेळू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे, ज्यात विल जॅक्स मुंबई इंडियन्सच्या हॉटेलमधून बाहेर पडताना दिसत आहे. विल जॅक्सचे संघात पुनरागमन मुंबई इंडियन्ससाठी मोठी सकारात्मक बातमी मानली जात आहे. विल जॅक्स तुफान फॉर्ममध्ये विल जॅक्स सध्या उत्कृष्ट फॉर्मात आहे. भारतात झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान त्याने इंग्लंडकडून दमदार कामगिरी केली होती. तो फलंदाजीसोबत गोलंदाजीही चांगली करतो. अष्टपैलू क्षमतेमुळे तो मुंबई इंडियन्सची ताकद निश्चितपणे वाढवणार आहे. मात्र, विल जॅक्स परतल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटसमोर मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे. प्लेइंग-११ मध्ये जागा कोणाला द्यायची आणि कोणाला बाहेर बसवायचे, हा प्रश्न आता संघ व्यवस्थापनाला पडला आहे. मुंबईच्या खेळाडूने पदार्पणातच केला नकोसा विक्रम कोण बाहेर होऊ शकतो? गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरला प्लेइंग-११ मध्ये संधी देण्यात आली होती. त्याने चांगली गोलंदाजी करत संघाला मदत केली. आता विल जॅक्स परतल्याने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागात पर्याय वाढला आहे. अशा स्थितीत मिचेल सँटनरला बाहेर बसवून विल जॅक्सला संधी देण्यात येऊ शकते, अशी चर्चा आहे. मुंबई इंडियन्सची आतापर्यंतची कामगिरी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. यात २ विजय आणि ४ पराभव नोंदवले आहेत. संघाने ४ गुण मिळवले असून, गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना २३ एप्रिल २०२६ रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणार आहे. विल जॅक्स परतल्यानंतर मुंबई इंडियन्सची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही मजबूत होणार असल्याने, चेन्नईविरुद्धचा सामना संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. विल जॅक्सच्या पुनरागमनामुळे मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) आत्मविश्वास निश्चितपणे वाढेल आणि संघ पुढील सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे.