Mumbai Goa Highway : कोकणवासीयांचा प्रवास खड्ड्यातूनच; मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण
Mumbai Goa Highway : ऑगस्ट महिना उजाडला तरी मुंबई-गोवा महामार्गाच्या (NH-66) चौपदरीकरणाचे काम अजूनही रखडलेल्या अवस्थेतच आहे.

Mumbai Goa Highway : मुंबई – गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे ऑगस्ट महिना सुरू झाला तरी अद्याप अपूर्ण राहिले आहे. ज्यामुळे यंदाच्या वर्षी सुद्धा आता कोकणवासीयांना गणपतीत खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळेच येत्या 9 ऑगस्टला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत. रविवारी रायगड दौऱ्यावर जाणारे राज ठाकरे या महामार्गाची पाहणी करणार आहेत. (Mumbai Goa Highway)
गेल्या 15 वर्षांपासून कोकणवासी या महामार्गाच्या प्रतीक्षेत आहेत. कोकणातील जनतेला नेहमीच यावर्षी महामार्ग पूर्ण होईल, गणपतीत प्रवास सुखकर आणि वेगवान होईल अशी आश्वासने देण्यात येतात. परंतु प्रत्यक्षात मात्र नागरिकांना खड्डे, वाहतूक कोंडी, अपूर्ण कामे आणि निकृष्ट दर्जाचा रस्ता यातूनच रस्ता काढत आपला प्रवास करावा लागत आहे. (Mumbai Goa Highway)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा दरवर्षी नवनवीन डेडलाईन देत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार, अशा बाता मारतात. मात्र, ती डेडलाईनच काय तर त्याच्या पुढील अनेक महिने होतात, तरी ते काम अपूर्णच दिसते. त्यामुळे जर का या महामार्गावरील सद्यस्थितीचा विचार केला तर या महामार्गावरील काम अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे. त्यातही सध्या या मार्गावरील माणगाव – इंदापूर या बायपासची जोरदार चर्चा रंगली आहे. (Mumbai Goa Highway)
या मार्गाचे काम ऑगस्टच्या अखेरपर्यंत पुर्ण होणार, असे सांगण्यात येत आहे. मात्र, ही डेडलाईन सुद्धा हुकणार असल्याचेच दिसून येत आहे. ज्यामुळे 9 ऑगस्टला जेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे या महामार्गाची पाहणी करतील, तेव्हा ते काय बोलतील, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (Mumbai Goa Highway)






