महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ, एकट्या मुंबईत 6347 नवीन रुग्ण

मुंबई – मुंबईत करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत शनिवारी मुंबईत 6347 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. तर एक दिवस आधी हा आकडा 5631 पर्यंत होता. त्यानुसार एका दिवसात 12 टक्के प्रकरणे वाढली आहेत. त्याचवेळी राज्यात शनिवारी करोनाचे 9170 नवीन रुग्ण आढळले असून 7 रुग्णांचा करोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय ओमिक्रॉनचे 7 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यातील एकूण ओमायक्रॉनची 460 प्रकरणे समोर आली आहेत. सर्व निर्बंध असतानाही मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. ख्रिसमस आणि नववर्ष साजरे करण्यासाठी सरकारने निर्बंध घातले होते, असे असतानाही बाजारपेठ व इतर अनेक ठिकाणी मोठी गर्दी दिसून आली.
तर कोविड निर्बंधांमुळे काही ठिकाणी शांतता होती. त्यापैकी गेटवे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, दादर, गिरगाव आणि जुहू बीच जवळपास निर्जन झाले होते, कारण या ठिकाणी आणि रस्त्यांवर कलम-144 अंतर्गत पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्रवारी मुंबईतही कोविडची प्रकरणे दिसून आली. शुक्रवारी मुंबईत कोविड-19 चे 5,631 नवीन रुग्ण आढळले.





