BMC Mayor : मुंबईचा महापौर जवळपास निश्चित? ‘या’ तीन महिला नगरसेविकांची नावे आघाडीवर
BMC Mayor : मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी महिला आरक्षण जाहीर झाल्याने चुरस वाढली आहे.

BMC Mayor : मुंबई महापालिकेच्या महापौर पदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
यावेळी महापौर पदासाठी खुला-महिला प्रवर्ग जाहीर झाल्याने, खुल्या प्रवर्गातील महिला नगरसेविकाच महापौर होणार, हे निश्चित झाले आहे. त्यामुळे महायुतीत हालचालींना वेग आला आहे.
महापालिकेत महायुतीचे स्पष्ट बहुमत
मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागून 15 दिवसांहून अधिक कालावधी झाला आहे. महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवल्याने आता महापौर पदासाठीचा निर्णय अंतिम टप्प्यात आला आहे. निवडणुकीनंतर अनेक महिला नगरसेविकांची नावे चर्चेत होती, मात्र आता ही शर्यत तीन नावांवर येऊन थांबली आहे.
‘या’ तीन नगरसेविकांमध्ये चुरस
सध्या महापौर पदासाठी शितल गंभीर, रितू तावडे आणि राजश्री शिरवाडकर या तीन महिला नगरसेविकांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत.
शितल गंभीर यांचे नाव आघाडीवर
महापौर पदाच्या शर्यतीत शितल गंभीर यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्या भाजपच्या मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. शिवाजी पार्क येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा विशेष उल्लेख करत कौतुक केले होते.
शितल गंभीर या दुसऱ्यांदा मुंबई महापालिकेवर निवडून आल्या आहेत. 2017 आणि 2024 या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपच्या तिकीटावर विजय मिळवला. माहीम-दादर मतदारसंघात ठाकरे गटाच्या वैशाली पाटणकर यांचा त्यांनी अवघ्या 125 मतांनी पराभव केला. त्या शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गंभीर यांच्या कन्या आहेत.
रितू तावडे – अनुभवी नगरसेविका
रितू तावडे या भाजपच्या ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेविका मानल्या जातात. 2012 मध्ये घाटकोपरमधून त्यांनी पहिल्यांदा विजय मिळवला. त्यानंतर सलग तीन निवडणुकांत त्या विजयी ठरल्या आहेत. त्यांनी मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपदही भूषवले आहे. त्यामुळे त्या महापौर पदाच्या मजबूत दावेदार मानल्या जात आहेत.
राजश्री शिरवाडकर यांचाही दावा मजबूत
भाजपच्या राजश्री शिरवाडकर या सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. 2012, 2017 आणि 2026 या निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. सध्या त्या भाजप मुंबई महिला मोर्चाच्या सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत.
इतर नावांचीही चर्चा
या तिघांव्यतिरिक्त तेजस्वी घोसाळकर, अलका केरकर, हर्षिता नार्वेकर, आशा मराठे आणि योगिता कोळी यांची नावेही महापौर पदासाठी चर्चेत आहेत. मात्र अंतिम निर्णय महायुतीच्या वरिष्ठ पातळीवरील बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे.






