Mumbai Cycle Ride : मुंबईच्या नगरसेवकांसाठी ‘सायकल राईड’! स्वच्छ हवेचा संदेश देण्यासाठी २२७ लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरणार
Mumbai Cycle Ride :

Mumbai Cycle Ride : सायकलिंग, शाश्वत जीवनमान आणि शहरी हवेच्या गुणवत्तेबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने मुंबईतील २२७ नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी २८ मार्च रोजी सायकल राईडचे आयोजन करण्यात आले आहे. दोन किमीची ही सायकल राईड दक्षिण मुंबईतील आझाद मैदानापासून सुरू होईल आणि मेट्रो सिनेमामार्गे पुढे जाऊन बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात समारोप होणार आहे.
या उपक्रमाचा उद्देश निवडून आलेल्या प्रतिनिधींना पर्यावरण संरक्षण आणि शहरातील पर्यावरणपूरक वाहतुकीच्या पद्धतींना प्रोत्साहन देण्याची गरज याबद्दल जागरूक करणे आहे, असे संयोजक विष्णुदास चापके म्हणाले. या वर्षी मुंबईत आम्ही फिटनेस आणि पर्यावरणीय जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी नवनिर्वाचित बीएमसी नगरसेवकांना प्रतीकात्मक राईडमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे.
नागरिकांमध्ये सायकलिंग संस्कृती आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी २०२२ पासून युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याने देशभरात सायकल मोहिमा आणि शर्यतींचे आयोजन करत आहे. राष्ट्रीय राजधानीत तीव्र वायू प्रदूषणामुळे बाह्य क्रियाकलापांना स्थगिती देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये नवी दिल्ली येथे संसद सदस्यांसाठी नियोजित अशीच सायकल राईड रद्द करण्यात आली होती, असे चापके म्हणाले.

