Mumbai BEST Bus Crash : मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत; आरोपीला 21 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Mumbai BEST Bus Crash : कुर्ल्यातील लालबहादूर शास्त्री (एलबीएस) मार्गावरील आंबेडकरनगर भागात ‘बेस्ट’ शहर वाहतूक सेवेच्या बसने 30 ते 40 वाहनांना ठोकरले. यात 7 जणांचा मृत्यू झाला तर 49 जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस इलेक्ट्रिक वाहन होते. कुर्ला स्टेशनहून येणाऱ्या या बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. अर्पण हाॅस्पिटलजवळ त्याचे नियंत्रण सुटले व सुमारे 500 मीटरपर्यंत त्याने रस्त्यावरील 30 ते 40 वाहनांना ठोकरले.
यात पाच ते सहा ऑटो रिक्षांचा चक्काचूर झाला. या आपघातातील आरोपीला 21 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. हा अपघात आहे की, कट याचा तपास बाकी असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे. त्या आधारावर न्यायालयाने आरोपी 21 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
चालकाने घाबरून एक्सलेटर दाबले
शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे म्हणाले की, कुर्ला स्थानकातून निघालेल्या बसचे ब्रेक निकामी झाले आणि चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. चालक घाबरला आणि ब्रेक दाबण्याऐवजी त्याने एक्सलेटर दाबला, त्यामुळे बसचा वेग वाढला.
बेस्टकडूनही दोन लाख
कुर्ला येथील बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना बेस्टकडून 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या अपघाताची चौकशी करण्यासाठी मुख्य वाहतूक व्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच जखमींवरील औषधोपचाराचा खर्च बृहन्मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट मार्फत केला जाईल, अशी माहिती बेस्टच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.





