Mumba Film Festival | पुण्यात होणार मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ; रसिकांसाठी देश-विदेशातील १०५ चित्रपटांची मेजवानी

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मुंबा फिल्म फाउंडेशनकडून येत्या २४ ते २८ सप्टेंबर या कालावधीत शहरात सहावा मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडणार आहे. या चित्रपट महोत्सवात देश-विदेशातील सुमारे १०५ चित्रपट मोफत दाखवले जाणार आहेत, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक जय भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन बुधवारी सकाळी ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते होणार आहे.
तर २८ सप्टेंबरला पुरस्कार वितरणासह समारोपाचा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात नागरिकांना दिग्दर्शक आणि निर्मात्यांसोबत खुला संवाद करण्याची संधीदेखील मिळणार आहे.यावेळी चित्रपटांचे प्रदर्शन राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयासोबत पंडित नेहरू नाट्यगृह आणि मराठवाडा मित्रमंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयात होईल. या वर्षी ३३ देशांतून १४२८ चित्रपटांनी या महोत्सवात त्यांची भागीदारी नोंदवली होती.
त्यापैकी २५ फीचर फिल्म्स, ७५ लघुपट, माहितीपट आणि ॲनिमेटेड फिल्म्सची निवड करण्यात आली आहे. यावेळी बोलताना संयोजक वीरेंद्र चित्राव म्हणाले की, भारताच्या चित्रपट वारशांचे जतन, दुर्मीळ चित्रपटांचे संरक्षण आणि चित्रपटातील तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे. यावेळी विद्यार्थी आणि नवोदित निर्मात्यांना प्रशिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे.




