Payal Kapadia: भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शिका पायल कपाडिया ( Payal Kapadia ) यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा मान मिळवला आहे. २०२६ मध्ये होणाऱ्या कान चित्रपट महोत्सव मध्ये त्यांची ‘क्रिटिक्स वीक’च्या ज्यूरी प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय ठरल्या आहेत. कान चित्रपट महोत्सव हा जगातील सर्वात प्रतिष्ठेचा चित्रपट सोहळा मानला जातो. येथे ‘क्रिटिक्स वीक’ हा विभाग नवोदित दिग्दर्शक आणि नवीन चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी ओळखला जातो. या विभागाच्या ज्यूरीचे नेतृत्व करणे ही खूप मोठी जबाबदारी असते. यंदा ही जबाबदारी पायल कपाडिया यांच्यावर सोपवण्यात आली आहे, ही भारतासाठी गौरवाची बाब आहे. Payal Kapadia पायल कपाडिया यांनी गेल्या काही वर्षांत आपल्या वेगळ्या शैलीतील चित्रपटांमुळे जागतिक पातळीवर ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाइट’ या चित्रपटाला २०२४ मध्ये कानमध्ये ‘ग्रँड प्रिक्स’ पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय चित्रपटविश्वात अधिक ठळकपणे समोर आले. त्यांची कथा सांगण्याची शैली, सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करण्याची पद्धत आणि स्त्रियांच्या आयुष्याचे वास्तव मांडण्याची ताकद यामुळे त्यांना विशेष मान मिळतो. Payal Kapadia Payal Kapadia ‘क्रिटिक्स वीक’नेही त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. त्यांच्या चित्रपटांमध्ये काव्यात्मकता आणि सामाजिक वास्तव यांचा सुंदर संगम दिसतो, असे त्यांनी म्हटले आहे. लोककथा, वर्गसंघर्ष, स्त्रियांचे जीवन आणि अदृश्य राहणाऱ्या गोष्टींना त्यांनी आपल्या सिनेमातून प्रभावीपणे मांडले आहे. या जबाबदारीबद्दल बोलताना पायल कपाडिया म्हणाल्या की, चित्रपट महोत्सवांमुळे त्यांच्या करिअरला सुरुवातीपासूनच मोठा आधार मिळाला. अशा मंचांमुळे जगभरातील कलाकारांशी संपर्क साधता आला आणि नवीन संधी मिळाल्या. नवोदित दिग्दर्शकांसाठी ‘क्रिटिक्स वीक’सारखे व्यासपीठ खूप महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. पायल कपाडिया यांच्या अनेक चित्रपटांनी यापूर्वीही कानमध्ये आपली छाप सोडली आहे. ‘ए नाईट ऑफ नोइंग नथिंग’ या त्यांच्या डॉक्युमेंट्रीला २०२१ मध्ये विशेष पुरस्कार मिळाला होता. तसेच त्यांच्या लघुपटांनाही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये मान्यता मिळाली आहे. १३ मे ते २१ मेदरम्यान होणाऱ्या या महोत्सवात पायल कपाडिया जगभरातील नव्या चित्रपटांचे परीक्षण करून विजेते निवडतील. त्यांच्या या निवडीमुळे भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर आणखी ओळख मिळण्याची शक्यता आहे.